महत्वाची बातमी : पुणे जिल्ह्यात 14 दिवस कलम 37 (1) व (3) चे आदेश लागू

लोणावळा : पुणे जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी वेगवेगळे पक्ष व संघटना यांच्याकडून मोर्चे व आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी केलेल्या मागणीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये 23 फेब्रुवारी 2024 रात्री बारा वाजून पाच मिनिटांपासून 7 मार्च 2024 रात्री बारा वाजेपर्यंत असा 14 दिवसांकरिता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 च्या कलम 37 (1) व (3) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पुणे जिल्हाधिकारी यांनी लागू केला आहे.
या कालावधीत 1) कोणतेही दाहक व स्फोटक पदार्थ व द्रव्य सोबत नेणे, 2) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, 3) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, 4) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढा-यांचे चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. 5) मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजवणे, 6) ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किया अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, 7) ज्या योगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने The Maharashtra Police Act (Bombay Act No. XXII of 1951) (Title Substituted For The Bombay Police Act, 1951) चे कलम 37 (1) व (3) विरुध्द वर्तन करणे, 8) पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे, पोलीस निरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे असे प्रकार करणारे शिक्षेस पात्र रहातील असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. अपर जिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हा आदेश पारित केला आहे.