Breaking news

तुंगार्लीतील ॐकार तरुण मंडळाचा सामाजिक उपक्रम; रक्तदानासह आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : ॐकार तरुण मंडळ, तुंगार्ली आणि श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या शिबिरात मंडळाचे सभासद, तुंगार्ली ग्रामस्थ तसेच लोणावळा शहरातील नागरिकांनी सहभाग घेत १४७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

      रक्तदान शिबिरानंतर ॐकार तरुण मंडळाच्या वतीने मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, तुंगार्ली यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. शिबिरात ३०२ नागरिकांची जनरल तपासणी, ८९ जणांची रक्त तपासणी, तर २३२ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना ३३६ चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

       नेत्र तपासणीदरम्यान मोतीबिंदूचे निदान झालेल्या आठ रुग्णांवर आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे या शिबिराचा लाभ केवळ तपासणीपुरता मर्यादित न राहता पुढील उपचारांपर्यंत पोहोचला आहे. या आरोग्य शिबिरासाठी डॉ. ऋतुजा तांडेल गोजे व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, तुंगार्ली, डॉ. वाडेकर तसेच ऑप्टोमेट्रिस्ट श्री. जीवक मोहिते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

       रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी ॐकार तरुण मंडळाच्या सर्व सभासदांनी परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविल्याबद्दल मंडळाच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे. या उपक्रमाचे आयोजन ॐकार तरुण मंडळ, तुंगार्ली-लोणावळाचे अध्यक्ष श्री. प्रसाद हरिलाल मावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

इतर बातम्या