Breaking news

Lonavala l परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची अचानक पाहणी; प्रवाशांची लूट करणाऱ्या स्टॉलधारकाची कानउघाडणी

लोणावळा : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकावर येणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना 'नाथजल'चे थंडगार पाणी अधिकृत दरात म्हणजेच केवळ १५ रुपयांना मिळालेच पाहिजे. जर कोणीही विक्रेता जादा दराने पाणी विकताना आढळला, तर त्याचा विक्री परवाना तातडीने रद्द केला जाईल, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिला. परिवहन मंत्र्यांनी आज सकाळी पुणे विभागातील लोणावळा बस स्थानकास अचानक भेट देऊन तेथील प्रवासी सेवा आणि सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यामुळे स्थानकावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. शिवसेनेचे लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर यांनी लोणावळा बस स्थानकामधील समस्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. शासनाचे बस स्थानक असताना अनेक बसेस या शहराबाहेर खाजगी हॉटेल समोर थांबत आहेत, ज्येष्ठ नागरिकांना लोणावळा बस स्थानकात पास सुविधा उपलब्ध होत नाही तसेच बस स्थानकामधील भौतिक सुविधा व बस स्थानकाचे सौंदर्यीकरण लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा देखील भोईर यांनी व्यक्त केली आहे.

पाहणी दरम्यान मंत्री सरनाईक यांनी थेट प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी प्रवाशांनी तक्रार केली की, बसस्थानकावर 'नाथजल'ची एक लिटरची बाटली १५ ऐवजी २० रुपयांना विकली जात आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्र्यांनी संबंधित विक्रेत्याची कानउघाडणी केली. विक्रेत्यांनी स्टॉलवर स्पष्टपणे 'दरफलक' लावणे बंधनकारक असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

खाजगी हॉटेलवरील बसच्या थांब्यावर बंदी

प्रवाशांनी मांडलेली दुसरी मोठी समस्या म्हणजे बसेसचे खाजगी हॉटेलवरील थांबे. अनेक बसेस लोणावळा बसस्थानकात न येता परस्पर पुढे जातात, तर काही बसेस जाणीवपूर्वक खाजगी हॉटेलांवर थांबवल्या जातात. तेथील महागडे खाद्यपदार्थ सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारे नसतात. यावर बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, कोणतीही एसटी बस खाजगी हॉटेलवर थांबणार नाही. वेळापत्रकातील सर्व बसफेऱ्या नाश्त्यासाठी आणि विश्रांतीसाठी लोणावळा बसस्थानकातच थांबल्या पाहिजेत. प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या चालक-वाहकांवरही कारवाई करण्यात येईल. तुमचे लागेबांधे बाजूला ठेवा व तात्काळ खाजगी बस थांबा बंद करत सर्व बस लोणावळा बस स्थानकामध्ये येऊ द्यात अशा शब्दात मंत्र्यांनी डेपो व्यवस्थापकाची कान उघाडणी केली आहे.

पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्या मध्यवर्ती असलेल्या लोणावळा-खंडाळा या प्रसिद्ध पर्यटनस्थळातील लोणावळा बसस्थानकाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. मात्र, आता प्रवाशांची ही प्रतीक्षा संपणार असून, येत्या दोन महिन्यांत 'वापरा आणि हस्तांतरित करा' (BOT) तत्त्वावर या ठिकाणी भव्य बहुमजली बसस्थानक उभारण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी सकाळी या बसस्थानकाची अचानक पाहणी करून अधिकाऱ्यांना सोयी-सुविधांबाबत कडक सूचना दिल्या.

मंत्र्यांचा 'ॲक्शन मोड'; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

गुरुवारी सकाळी १०:३० च्या सुमारास प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्ष, उपहारगृह, स्वच्छतागृह आणि प्रवासी बैठक कक्षाची बारकाईने पाहणी केली. स्वच्छता आणि व्यवस्थापनात दिसलेल्या हलगर्जीपणाबद्दल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी केली. विशेष म्हणजे, मंत्र्यांच्या दौऱ्याची चाहूल लागताच प्रशासन खडबडून जागे झाले आणि घाईघाईने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. एरव्ही रिकाम्या दिसणाऱ्या स्थानकात अचानक बसेसची संख्या वाढल्याचे पाहून मंत्र्यांनी संताप व्यक्त केला आणि "इतर वेळी या बसेस कुठे असतात?" असा सवाल विचारत दररोजची बससेवा नियमित करण्याचे आदेश दिले.

टॅक्सी चालकांच्या समस्या आणि 'ओला-उबर'चा वाद

गेल्या तीन दिवसांपासून लोणावळा-खंडाळा टॅक्सी चालक-मालक संघटनेने ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या सेवांमुळे स्थानिक व्यवसायावर होणाऱ्या परिणामाविरोधात उपोषण सुरू केले होते. या दौऱ्यादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरनाईक यांची भेट घेऊन या सेवांवर बंदी घालण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

या पाहणी दौऱ्यावेळी परिवहन महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया यांच्यासह महामंडळाचे विविध अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

इतर बातम्या