Karla News l “कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” मोहिमेला कार्ला गावात उत्साहात प्रारंभ

लोणावळा : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारणे गरजेचे आहे, असे मत राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ यांनी व्यक्त केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा II अंतर्गत “कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” या विशेष मोहिमेचा शुभारंभ कार्ला ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शेखर रौंदळ यांच्या हस्ते झाले. या वेळी बोलताना रौंदळ म्हणाले, “गावागावांत स्वच्छतेसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा नागरिकांनी योग्य वापर करून गाव स्वच्छ आणि सुंदर ठेवावे. कंपोस्ट खड्ड्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करून दर्जेदार सेंद्रिय खत तयार करावे. या खताच्या विक्रीतून उत्पन्न मिळवता येईल, जे गावातच रोजगार निर्मितीचे साधन ठरेल.”
या प्रसंगी जिल्हा परिषद पुणेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) आप्पासाहेब गुजर, गटविकास अधिकारी के. के. प्रधान, राज्य समन्वयक आशिष थोरात, शालेय समिती अध्यक्ष सोनबा गोपाळे, उपसरपंच अभिषेक जाधव, ग्रामपंचायत सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, पोलीस पाटील संजय जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विकास कुडवे, संदीप पानसरे, श्रीमती मेधा दातरंगे, अनिता शिंदे, ग्रामसेवक सुभाष धोत्रे, मुख्याध्यापक संजय वंजारे आणि ग्रामपंचायत अधिकारी तसेच गावकरी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.