Breaking news

आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी उपस्थित करत मांडलेला मुद्दा अतिशय गंभीर आहे; चौकशी साठी एसआयटी नेमणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्याचे लोकप्रतिनिधी अर्थात आमदार सुनील शेळके यांना मारण्यासाठी काही हत्यार बंद मारेकरी मावळ तालुक्यामध्ये आले होते. त्यांना 2023 साली पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या दरोडा पथकाने हत्यारांसह ताब्यात घेतले होते. तपासा दरम्यान त्यांनी आमदार सुनील शेळके यांना मारण्यासाठी हत्यारे आणली असल्याची माहिती दिली आहे. काही दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर ते जामिनावर बाहेर आले आहे. त्यांना पोलीस विभागाने तडीपार केलेले असताना देखील ते मावळ परिसरात व पुणे जिल्ह्यामध्ये फिरत असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडत उपस्थित केली आहे. तसेच या व्यक्तींना हत्यारे पुरवणारे व त्यांच्या जामीनासाठी लाखो रुपये खर्च करत मोठे वकील देणारा या कटाचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे? याचा शोध पोलीस यंत्रणा व गृह विभागाने घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आमदार सुनील शेळके यांनी मांडलेली लक्षवेधी व उपस्थित केलेला सुरक्षेचा मुद्दा हा अतिशय गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल व तपासासाठी एसआयटी नियुक्त केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत सदर लक्षवेधीवर उत्तर देताना दिली आहे.

      2023 साली पिंपरी चिंचवड पोलिसांनी पिस्टल व काडतुसांसह ताब्यात घेतलेले आरोपी हे सराईत आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मध्यप्रदेश मधून त्यांनी ही हत्यारे आणली होती अशी माहिती तपासात उघड झाली आहे. आमदार सुनील शेळके म्हणाले, या प्रकरणाची सखोल चौकशी करत प्रकरणाचा खरा सूत्रधार कोण आहे याचा शोध घेणे व तो चेहरा समोर आणणे गरजेचे आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याप्रकरणी आजपर्यंत झालेल्या तपासाची माहिती दिली व आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारे या घटनेचा सखोल तपास केला जाईल व याकरता वेळ पडल्यास एसआयटी देखील नियुक्त केले जाईल अशी माहिती दिली आहे.

इतर बातम्या