Breaking news

लोणावळ्यात केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांची व्यापारी संघाने घेतली भेट; ब्लिंकिट ऑनलाईन सर्व्हिस मुळे लोणावळ्यातील लहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत असल्याची मांडली खंत

लोणावळा : केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक आज एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्त लोणावळा शहरांमध्ये आले होते. त्यावेळी लोणावळा व्यापारी संघाने त्यांची भेट घेत ब्लिंकिट ह्या ऑनलाईन किराणा व दैनंदिन गरजा सेवा पुरवणाऱ्या कंपनीमुळे लोणावळा शहरातील लहान सहान व्यवसायिकांवर मोठा परिणाम झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. ब्लिंकिट या ऑनलाइन सर्विस मुळे लोणावळ्यातील अनेक दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला असून यावर योग्य त्या उपाययोजना करत लोणावळा शहरांमधील ब्लिंकिट ही ऑनलाईन सर्व्हिस बंद करण्यात यावी अशी मागणी यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दिलीप गुप्ता यांनी केली आहे. तसेच कोविड काळापासून लोणावळा शहरामध्ये ज्या मेल एक्सप्रेस गाड्या थांबत होत्या त्या थांबणे बंद झाले आहेत त्या गाड्यांचा थांबा पूर्ववत करण्यात यावा असे देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे. ब्लिंकिट ही ऑनलाईन सेवा देणारी कंपनी ग्राहकांना घरपोच काही मिनिटांमध्ये सेवा पुरवत असल्यामुळे ग्राहक घरातून बाहेर पडत आजूबाजूच्या लहान- सहान दुकानात देखील खरेदी करत नसल्यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न येथे उपस्थित होऊ लागला आहे.

     लोणावळा व्यापारी संघाचे अध्यक्ष दिलीप गुप्ता यांच्या समवेत लोणावळा नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी हॉटेल असोसिएशनचे अनिश गणात्रा लोणावळा येथील वास्तु विशारद अजय मराठे, हॉटेल व्यवसायिक सुनील गुप्ता आदी यावेळेस उपस्थित होते. केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यापारी संघाचे म्हणणे समजून घेतले त्याप्रमाणे आपले निवेदन द्या ते मुख्यमंत्री व केंद्रीय वाणिज्य विभाग यांना देऊन आपल्या समस्येचे निराकरण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो असे सांगितले आहे.

इतर बातम्या