मोठी कारवाई l तुंगार्लीतील बांधकाम साईटवर चोरी; लोणावळा पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केली अटक
लोणावळा : तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅली परिसरातील बांधकाम साईटवरून इलेक्ट्रिक वायर व कॉपर पाईप असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करत लोणावळा शहर पोलिसांनी एका संशयिताला अटक करून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल विजय पालांडे (वय ३२, रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) याला दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजून १२ मिनिटांनी अटक करण्यात आली. त्याच्याकडून चोरीस गेलेला १ लाख ५७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत प्रद्युम उमेशचंद जैसवाल (वय २४, व्यवसाय सुपरवायझर, रा. कैलासनगर, लोणावळा) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दिनांक ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मौजे गोल्ड व्हॅली, तुंगार्ली, लोणावळा येथील स्कायराईज इन्फ्रा या बांधकाम कंपनीच्या साईटवरील बंगला क्रमांक १ येथे चोरी झाली. दरवाजा नसलेल्या या बंगल्यातील इलेक्ट्रिक वायर आणि कॉपर पाईप अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
चोरीस गेलेल्या मालामध्ये १ लाख ५० हजार रुपये किमतीच्या काळ्या, लाल, निळ्या व हिरव्या रंगाच्या इलेक्ट्रिक वायर, तसेच ७ हजार ५०० रुपये किमतीचा ५० फूट लांबीचा कॉपर पाईप यांचा समावेश होता. चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत १ लाख ५७ हजार ५०० रुपये आहे. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार खोपडे करीत होते. तपासादरम्यान संशयित निखिल पालांडे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली.


















