‘अजित जनसंवाद विकास अभियाना’ची कार्ला-खडकाळा गटात उत्साहात सांगता
लोणावळा : पुणे जिल्हा परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यात राबविण्यात आलेल्या ‘अजित जनसंवाद विकास अभियाना’ची कार्ला - खडकाळा जिल्हा परिषद गटात नागरिकांशी थेट संवाद साधत अत्यंत उत्साहात सांगता झाली. गुरूवारी संत तुकाराम महाराज मंदिर, वाकसई येथे संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या जनसंवाद कार्यक्रमात स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी आपल्या विविध समस्या व विकासाच्या मागण्या मांडल्या. या सर्व बाबींची गांभीर्याने नोंद घेत प्रशासकीय व राजकीय पातळीवर प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन उपस्थितांना देण्यात आले.
मावळवर स्वर्गीय अजितदादांचे नितांत प्रेम; निधी कमी पडू देणार नाही!
कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना पुणे जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती मा. जितेंद्र (भैय्या) बडेकर म्हणाले, "पुढील चार वर्षांत समाजकल्याण विभागामार्फत मावळ तालुक्यातील कोणतेही विकासकाम अपुरे राहणार नाही. मावळ तालुक्यावर स्वर्गीय अजितदादांचे नितांत प्रेम होते आणि ते प्रेम आपण कधीही कमी होऊ देणार नाही. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल."
या कार्यक्रमास पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश खांडगे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष तानाजी पडवळ, तालुका महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष किशोर सातकर, बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली दीपक हुलावळे, मावळ पंचायत समितीच्या सभापती सुनिता येवले, पंचायत समिती सदस्य समीर खंडू जाधव, रेश्मा देवकर, ज्येष्ठ नेते भरतभाऊ येवले, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती किरण हुळावले, माजी सभापती बाळासाहेब भानुसघरे आणि ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मारुती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय गटविकास अधिकारी थोरात यांच्यासह कार्ला-खडकाळा गटातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पक्षाचे विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली दीपक हुलावळे यांनी केले. यामध्ये त्यांनी गटातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव अमोल केदारी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहकार सेलचे तालुका अध्यक्ष गणपतराव भानुसघरे यांनी मानले.



















