Breaking news

ऑनलाइन जगात ‘स्मार्ट’ नव्हे तर ‘सेफ’ व्हा! खोपोलीच्या कार्मेल कॉन्व्हेंटमध्ये पोलिसांकडून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

खोपोली (प्रतिनिधी) : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे सायबर धोके लक्षात घेता विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल जबाबदारी आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्मेल कॉन्व्हेंट शाळेत ३ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पाच दिवसीय सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.

     रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या पुढाकारातून, खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल आणि खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शंकर धुमाळ यांनी विद्यार्थ्यांना ‘डिजिटल तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण वापर’ या विषयावर प्रबोधन केले. या उपक्रमाच्या आयोजनासाठी कार्मेल कॉन्व्हेंटच्या स्थानिक व्यवस्थापक सिस्टर ज्युली मारिया, मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, उपमुख्याध्यापिका सिस्टर सरूपिया तसेच दर्शना टीचर, दिनू टीचर आणि दिपाली टीचर यांनी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांचे नियोजन आणि आयोजन करत सक्रिय सहभाग नोंदविला.

     सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, सोशल मीडिया आणि मोबाईल ॲप्लिकेशनचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव, डिजिटल गोपनीयता, पासवर्ड सुरक्षा तसेच वाढता स्क्रीन टाइम याबाबत विद्यार्थ्यांना विविध माध्यमांतून माहिती देण्यात आली. डिजिटल जगतातील धोके केवळ तांत्रिक नसून त्यांचा परिणाम वैयक्तिक सुरक्षितता, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जीवनावरही होऊ शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

     या जनजागृती उपक्रमांतर्गत इयत्ता नववीतील ३० विद्यार्थ्यांच्या समितीने पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयावरील कृतीयुक्त गाणी, कविता, भाषण, गटचर्चा, पोस्टर, घोषवाक्य, व्यंगचित्र आणि अम्ब्रेला पेंटिंग यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच विविध वर्गांमध्ये दृकश्राव्य सादरीकरणाच्या माध्यमातून सायबर सुरक्षेविषयी माहिती देण्यात आली.

      ७ ऑगस्ट रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात खोपोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शंकर धुमाळ, पोलीस हवालदार संतोष रुपनवर तसेच डिजिटल धोक्यांपासून व्यक्ती व संस्थांचे संरक्षण करण्याच्या क्षेत्रात कार्यरत आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. स्टेफी मॅथ्यू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

      यावेळी सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली खबरदारी, नव्याने उद्भवणारे डिजिटल धोके, ऑनलाइन व्यवहारातील दक्षता, सोशल मीडियाचा जबाबदारीपूर्ण वापर आणि स्क्रीन टाइमचे योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मान्यवरांनी उदाहरणांसह उत्तरे दिली. 

      सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाकडे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून न पाहता, त्याचा सुरक्षित, सजग आणि जबाबदारीपूर्ण वापर करण्याची जाणीव निर्माण झाली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी संस्कृती सक्रे हिने केले, तर वैष्णवी मांगले हिने आभार प्रदर्शन केले.

इतर बातम्या