नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देऊन देखील नागरिक रस्त्यावर टाकतात कचरा; नगरपरिषदेकडून कारवाईच्या नावाने बोंब
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये पुन्हा कचरा समस्या निर्माण होऊ लागली आहे. घरोघरी घंटागाड्यात जात असून, नगरपरिषदेकडून घंटागाडी मध्येच कचरा टाका अशा स्वरूपाच्या वारंवार सूचना देऊन देखील नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. तर दुसरीकडे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर व व्यवसायिकांवर नगरपरिषदेकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नगर परिषदेच्या आव्हानाला नागरिक केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना लोणावळा शहर यांनी देखील याबाबत नगरपरिषदेला लेखी निवेदन देत शहरातील कचऱ्याची समस्या सोडवा अशी मागणी केली आहे.
मागील काही वर्ष स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये लोणावळा शहराने उत्तम कामगिरी केली. नागरिकांनी देखील या स्वच्छता अभियानामध्ये नगर परिषदेला मोठी साथ दिली. त्यामुळे अनेक कोटी रुपयांची बक्षिसे नगर परिषदेला प्राप्त झाली आहेत. मागील एक-दोन वर्षांमध्ये मात्र या स्वच्छता अभियानाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत असून घरोघरी घंटागाड्या जात असताना देखील नागरिक सर्रासपणे रस्त्यावर कचरा टाकत आहेत. यामुळे शहरातील बहुतांश भागांमध्ये रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. एकीकडे नागरिक नगर परिषदेच्या सूचनेकडे कानाडोळा करत आहे तर दुसरीकडे रस्त्यावर कचरा टाकून लोणावळा शहराला कचरामय बनवणाऱ्या नागरिकांवर नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची दंडात्मक कारवाई होताना दिसत नाही. सार्वजनिक उत्सव सध्या सुरू आहेत. हे होत असताना शहरांमधील अनेक रस्त्यांवर व रस्त्यांच्या कडेला कचरा दिसत आहे. लोणावळा शहर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. वेगवेगळ्या राज्यांमधून तसेच वेगवेगळ्या देशांमधून पर्यटक या शहरामध्ये येत असतात. येथील अस्वच्छतेमुळे पुन्हा लोणावळ्याच्या नावलौकिकाला बाधा निर्माण होणार आहे.
लोणावळा शहरांमध्ये निर्माण झालेली ही स्वच्छतेची समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगर परिषदेने पुढाकार घेणे गरजेचे आहे व त्यामध्ये नागरिकांना देखील विश्वासात घेऊन शहरात पुन्हा एकदा स्वच्छतेचा जागर करणे गरजेचे असल्याचे मत जाणकार नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सांगत आहेत. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने मागील दीड ते दोन वर्षांमध्ये शहरांमध्ये एकही स्वच्छता अभियान राबवण्यात आलेले नाही. काही सामाजिक संस्थांकडून शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्याला देखील नगरपरिषदेकडून अपेक्षित असे सहकार्य प्राप्त झालेले नाही. नगरपरिषदेच्या या उदासीनतेमुळे व नागरिकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरात पुन्हा एकदा कचऱ्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा नगर परिषदेचे कर्मचारी व ठेकेदार कर्मचारी यांच्याकडून उचलला जात आहे. मात्र पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कचरा पडत आहे. नगर परिषदेचे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे उघड डोळ्याने पहात असताना देखील कोणतीही कारवाई संबंधितांवर होत नाही. इंद्रायणी नदीतील जलपर्णी व घाण यामुळे शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, असे असताना देखील नदीपात्रांमध्ये अनेक ठिकाणी कचरा पडत असल्याचे दिसून येत आहे. शहरात निर्माण होत असलेल्या या कचऱ्याच्या समस्येकडे नगरपरिषदेने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

















