ऐतिहासिक राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या राजमाचीकरांच्या वाट्याला मरण यातना; वीज, पाणी व रस्ता यापासून आजही गाव वंचित
लोणावळा : पर्यटन नगरी लोणावळा शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ऐतिहासिक राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या राजमाचीकरांच्या वाट्याला स्वतंत्र्याच्या 79 वर्षानंतर देखील मरण यातना कायम आहेत. या गावाला अद्यापही वीज, पिण्याची पाणी व रस्ता उपलब्ध नाही. यंदाच्या पावसाळ्यामध्ये राजमाची किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर कातळधार या ठिकाणी एक मोठी दरड रस्त्यावर कोसळल्याने राजमाची कडे जाणारा रस्ता बंद झाला होता. तर उर्वरित असलेला कच्चा रस्ता पाण्यामुळे वाहून गेला. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले, काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. अशा या परिस्थितीवर मात करत या ठिकाणी राहणारे नागरिक राजमाची किल्ला ते लोणावळा असा प्रवास करत आहेत.
मावळ तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असताना राजमाची उधेवाडी ही गावे विकासापासून दुर्लक्षित राहिली आहे. येथील ग्रामस्थांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रामध्ये व राज्य मध्ये सरकार आल्यानंतर शासनाचे लक्ष आमच्याकडे जाईल व आमच्या गावाचा विकास होईल अशी आमची अपेक्षा होती मात्र आमच्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याचे या गावातील ग्रामस्थ बबन सावंत व इतरांनी म्हटले आहे. सध्या या गावातील नागरिकांकडून श्रमदानातून खराब झालेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.
राजमाची किल्ल्याचा परिसर व त्याकडे जाणारा रस्ता हा सर्व भाग वनविभागाच्या मालकीचा असल्यामुळे या ठिकाणी विकास कामे करण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागात अद्याप रस्ता झालेला नाही, लोक वस्ती देखील लहान प्रमाणामध्ये असल्यामुळे या ठिकाणी अद्याप वीज देखील पोहोचलेली नाही तसेच पिण्याच्या पाण्याचे सुविधा नसल्यामुळे गावाच्या खालील बाजूला असलेल्या एका तलावातून ग्रामस्थ पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. भीमाशंकर अभयारण्याचा हा सर्व भाग असल्यामुळे व संरक्षित वन असल्यामुळे वन्य जीवांच्या सुरक्षिततेचा विचार करत या भागामध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्यास परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहेत.
या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेकर्स व पर्यटक फिरायला येत असतात. त्यांच्या राहण्याची व जेवणाची सुविधा येथील ग्रामस्थांमार्फत अल्प दरात केली जाते. काही उपद्रवी पर्यटकांमुळे येथील पर्यटन व परिसर काही अंशी बदनाम होत आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करत येथे राहणाऱ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. राजमाची हे गाव लोणावळा व खंडाळा या शहरांपासून 16 ते 18 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे कामधंद्याच्या निमित्त येतील तरुण मंडळी ही शहरी भागामध्ये राहतात व वयस्कर जेष्ठ मंडळी गावामध्ये रहात आहेत. या ठिकाणी जाणारा रस्ता अतिशय खडतर असल्यामुळे गावात कोणी आजारी पडले अथवा काही तातडीची मदत हवी असल्यास मोठ्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कच्च्या रस्त्यावरून देखील प्रवास करता येऊ शकतो मात्र पावसाळ्यात येथील परिस्थिती फारच बिकट होत असल्यामुळे शासनाने येथील रस्ता प्राधान्य क्रमाने करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

















