Breaking news

बालकांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळणे गरजेचे : ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे

लोणावळा : बालकांच्या कल्पनाशक्तीला योग्य चालना मिळेल अशा प्रकारची अभ्यासव्यतिरिक्त अवांतर पुस्तके मुलांनी वाचावीत, यासाठी शिक्षक आणि पालकांनी नेहमी जागृत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तिसऱ्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ बालसाहित्यिक राजीव तांबे यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), समर्थ युवा फाऊंडेशन, मराठी भाषा विभाग आणि लोणावळा येथील मनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण ठरलेल्या तिसऱ्या 'नांदी संमेलना'चे आज लोणावळ्यातील मनशक्ती केंद्रात दिमाखदार उद्घाटन झाले. या उद्घाटन प्रसंगी संमेलनाध्यक्ष पदावरून तांबे बोलत होते.

      कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे अध्यक्ष योगेश सोमण यांच्या हस्ते पार पडले. व्यासपीठावर मनशक्ती केंद्राचे कार्यकारी विश्वस्त व स्वागताध्यक्ष प्रमोदभाई शिंदे, म.सा.प.चे स्थानिक कार्यवाह माधव राजगुरू, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष व जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे तसेच म.सा.प. पुणेचे स्थानिक कार्यवाह प्रसाद मिरासदार आदी मान्यवर उपस्थित होते.

योग्य उत्तरे मिळाल्यास बालकांचा उत्तम लेखक बनेल

आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राजीव तांबे पुढे म्हणाले की, बालमनात कमालीची उत्सुकता असते आणि त्यापोटी अनेक प्रश्नांचे काहूर माजलेले असते. मुलांच्या या प्रश्नांना योग्य भाषेत आणि योग्य ती उत्तरे मिळाली, तर भविष्यात त्या बालकाचे एका उत्कृष्ट लेखकात रूपांतर होऊ शकते. यावेळी योगेश सोमण म्हणाले की, आगामी जानेवारी महिन्यात होणारे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात आयोजित केले जाणार असून, लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाला साहित्याची पर्वणी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रमोदभाई शिंदे यांनी संमेलन आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली, तर प्रसाद मिरासदार यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात विविध सांस्कृतिक आणि साहित्यावर आधारित कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली:

अक्षरगाणी : स्वरकुल ट्रस्ट निर्मित, प्रसाद मिरासदार लिखित व त्यागराज खाडिलकर दिग्दर्शित अभिजात वाचन संस्कृतीचा द्विपात्री संगीत-नाट्य आविष्कार 'अक्षरगाणी' हा कार्यक्रम दीपिका जोग आणि त्यागराज खाडिलकर यांनी सादर केला.

रेषांची भाषा : दुपारच्या सत्रात प्रसिद्ध व्यंगचित्रकार चारूहास पंडित यांच्याशी प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी संवादात्मक कार्यक्रम घेतला.

विज्ञान गप्पागप्पी व काव्यरंग : संमेलनाध्यक्ष राजीव तांबे यांनी 'विज्ञान गप्पागप्पी' या उपक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यानंतर मुलांच्या समृद्ध कविता वाचनाचा 'कोवळे काव्यरंग' हा कार्यक्रम पार पडला.

      याशिवाय योगेश सोमण दिग्दर्शित 'ज्योती' हा माहितीपट आणि मराठी भाषा विभागाच्या कार्यावर प्रकाश टाकणारी चित्रफित उपस्थितांना दाखवण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुल हायस्कूल (इंग्रजी माध्यम) च्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली.

       उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले, तर दीपक आलूरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. साहित्य, विज्ञान आणि कला या तिन्ही क्षेत्रांचा संगम असणारे हे संमेलन लहानांसह मोठ्यांसाठीही एक उत्तम ज्ञानपेठ व मेजवानी ठरले.

इतर बातम्या