डॉक्टर साहेब घाबरू नका… आम्ही सर्व लोणावळाकर आपल्या सोबत आहोत - सर्वपक्षीय नेत्यांनी दिला डॉक्टर खंडेलवाल यांना दिलासा

लोणावळा : डॉक्टर साहेब घाबरू नका… आम्ही सर्व लोणावळाकर नागरिक आपल्या सोबत आहोत असा दिलासा लोणावळा शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी डॉक्टर खंडेलवाल यांना दिला आहे. लोणावळा शहरांमधील सर्व राजकीय पक्षांचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांनी आज डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला आहे. हा केवळ तुमच्यावर पडलेला दरोडा नाही तर समस्त लोणावळाकर नागरिकांवर पडलेला दरोडा असल्याने या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पोलीस प्रशासनाने करावेत याकरिता सर्व नागरिक पाठपुरावा करतील व आपल्याला न्याय मिळवून देतील असे आश्वासन या भेटीदरम्यान सर्वपक्षीय नेते मंडळींनी डॉक्टर खंडेलवाल यांना दिले आहे.
डॉक्टर हिरालाल खंडेलवाल हे लोणावळा शहरांमधील प्रसिद्ध असे बालरोगतज्ञ आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते लोणावळा कर व परिसरातील नागरिकांची सेवा करत आहेत. आज मोठे झालेले नेतेमंडळी नागरिक ही एकेकाळी डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्याकडे बाल रुग्ण म्हणून येत असत. अशा या डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर चार वर्षात दोन वेळा सशस्त्र दरोडा पडला आहे तर दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. वारंवार एकाच ठिकाणी अशा घटना घडत असताना देखील पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप डॉक्टर खंडेलवाल यांचे नातेवाईक यांनी केला आहे. सोमवारी रात्री उशिरा डॉ. खंडेलवाल यांच्या प्रधान पार्क सोसायटी येथील बंगल्यावर दरोडा पडला होता. दरोडा पडत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या समोर दरोडेखोर जात असताना देखील पोलिसांनी केवळ सिनेस्टाईल त्यांच्या मागे गाडी पळवण्या व्यतिरिक्त काही केले नाही. पोलिसांनी समय सूचकता दाखवत आरोपींना पकडले असते तर तात्काळ गुन्हा उघडकीस आला असता मात्र पोलिसांनी असे न करण्यामागील नेमके कारण काय असा प्रश्न देखील या निमित्त डॉक्टर खंडेलवाल यांचे नातेवाईक व राजकीय नेते मंडळी यांनी उपस्थित केला आहे.
डॉक्टर खंडेलवाल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना या दरोडाच्या घटने मधून झालेला मानसिक त्रास व बसलेला धक्का यामधून बाहेर काढत त्यांच्या पाठीशी समस्त लोणावळाकर नागरिक आहेत, हे आश्वासित करण्यासाठी आज या सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली. पुढील आठ दिवसांमध्ये या दरोड्यांमधील आरोपींना अटक करत चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला नाही तर समस्त नागरिकांच्या वतीने लोणावळा बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. तसेच दरोडेखोर समोर असताना देखील त्यांना न पकडता बघायची भूमिका घेणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांच्या निलंबनाची देखील मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली आहे.