Breaking news

पोलिसांच्या डोळ्यासमोर दरोडेखोर पळाले; … पोलिसांची प्रतिमा मलिन करणाऱ्या त्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित करा - लोणावळ्यातील सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

लोणावळा : लोणावळ्यातील डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या प्रधान पार्क सोसायटीमधील बंगल्यामध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर 20 ते 22 जणांनी सहस्त्र दरोडा टाकला. हा दरोडा पडत असताना डॉक्टर खंडेलवाल यांचे पुतणे तरुण खंडेलवाल यांनी लोणावळा शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आठ ते दहा मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले हे खरे असले तरी पोलिसांच्या समोर सदरचे दरोडेखोर पळत होते. अगदी पाच ते दहा फुटाच्या अंतरावर दरोडेखोर असताना गाडीमध्ये बसून बघ्याच्या भूमिकेत राहिलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक व इतर पोलीस कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी लोणावळा शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेते मंडळींनी आज लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांना भेटून त्यांच्याकडे केली आहे. त्या अधिकाऱ्यांमुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून शरमेने खाली गेली आहे असे देविदास कडू म्हणाले.

      सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब झाडणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव हे दरोडेखोर समोर असताना गाडीत गप्प बसून राहिले, अशा निष्क्रिय व सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याला खात्यामधून निलंबित करा व आठ दिवसात दरडोखोरांना हजर करा अन्यथा लोणावळा शहर बंद करून पोलिसांच्या विरोधात जोरदार निदर्शने करणार असल्याचा इशारा यावेळी सर्व पक्षियानी दिला आहे. 

     लोणावळा शहरामध्ये मागील अनेक वर्ष वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर हिरालाल खंडेलवाल यांच्या घरावर आतापर्यंत दोन वेळा सशस्त्र दरोडा पडला असून दोन वेळा दरोड्याचा प्रयत्न झाला आहे. सोमवारी मध्ये रात्री पडलेला दरोडा अतिशय भयंकर असा होता. डॉक्टर दांपत्य व त्यांच्याकडे काम करणारे कर्मचारी यांना बांधून ठेवून त्यांना धारदार शास्त्राचा धाक दाखवत वीस ते पंचवीस जणांनी घरात घुसून हा दरोडा टाकला होता. बंगल्या मधून बाहेर पडणारे दरोडेखोर व घटनास्थळी आलेले पोलीस यांच्यामध्ये जेमतेम पाच ते दहा फुटाचे अंतर असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. दरोडेखोर पकडले जाणे गरजेचे होते मात्र त्या ठिकाणी नेमके काय झाले याची खात्याअंतर्गत चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर करू तसेच आठ दिवसात दरोडेखोर पकडून समोर आणू असा शब्द लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली आहे. रात्रीची गस्त देखील वाढवण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक जगताप यांनी दिले आहे.

     यावेळी बोलताना भाजपाचे गटनेते देविदास कडू म्हणाले, दरोडेखोर समोर असताना देखील एक अधिकारी व तीन कर्मचारी गाडीमध्ये होते त्यांनी समय सूचकता दाखवत आरोपी पकडणे गरजेचे होते मात्र त्यांनी गाडीतून खाली उतरण्याची देखील तसदी घेतली नाही अशा या अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांची आम्हाला गरज नाही. या दरोडाच्या व आज घडलेल्या दुसऱ्या चोरीच्या घटनेमुळे लोणावळा शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस नागरिकांची सुरक्षा करणार नसतील तर आम्हालाच हातामध्ये हत्यारे घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल असा स्पष्ट इशारा भाजपाचे माजी शहराध्यक्ष अरुण लाड व देविदास कडू यांनी दिला आहे. मनसेचे प्रवक्ते अमित भोसले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचा धाक दाखवत त्यांच्यावर दडपशाही करणारा हा अधिकारी दरोडेखोरांना पाहून गाडीतून खाली देखील उतरला नाही, यामागचे नेमके कारण काय असा प्रश्न उपस्थित केला आहे. लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष विलास बडेकर व शिवसेनेचे शहर प्रमुख संजय भोईर म्हणाले वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी चेक नाके लावून पर्यटकांना व सर्वसामान्य नागरिकांना अडवून त्यांना त्रास देणे, त्यांच्या गाड्यांचे तपासणी करत त्यांच्याकडून चिरीमिरी घेणे असले धंदे करण्यापेक्षा लोणावळा शहरातील कायदा व सुव्यवस्था नीट राखण्याकडे लक्ष द्या.

     काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर म्हणाले आमच्या लोणावळाकर नागरिकांच्या तीन मागणी आहेत. डॉक्टर खंडेलवाल यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील दरोडेखोरांना आठ दिवसात जेरबंद करावे. दरोडेखोरांना पकडण्यामध्ये हलगर्जीपणा करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व अन्य कर्मचारी यांची खात्यांतर्गत चौकशी करत त्यांच्यावर कारवाई व्हावी व लोणावळा शहरांमधील ग्रस्त वाढवत या शहरांमध्ये पुन्हा चोरीच्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. आठ दिवसात यामध्ये सकारात्मकता न दिसल्यास लोणावळा शहर बंद करत सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासीर भाई शेख, मनसेचे अध्यक्ष निखिल भोसले, विवेक भांगरे, भाजपा अध्यक्ष अनिल गायकवाड आदी नेतेमंडळी व इतर पदाधिकारी यांनी या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाच्या एकंदरीत कामगिरीवर व कार्यपद्धतीवर संतप्त भावना व नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचे देखील भेट घेत त्यांच्यासमोर ह्या मागण्या करणार आहोत. लोणावळा शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांना वाहने आडवून त्रास देणे पोलिसांनी बंद करावे व शहरांमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी काम करावे अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे.

इतर बातम्या