आनंदवार्ता l सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. संतोष दबडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील प्राध्यापक आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाचे समन्वयक डॉ. संतोष दबडे यांना संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
‘Investigation of Evaporative Cooling Characteristics of Pottery and Indigenous Material’ या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. हे संशोधन त्यांनी डॉ. जगन्नाथ हिरकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, गोवा येथे पूर्ण केले. हे महाविद्यालय गोवा विद्यापीठाशी संलग्न आहे. मातीची भांडी आणि स्थानिक सामग्रीच्या बाष्पीभवनाद्वारे शीतकरणाच्या गुणधर्मांचा अभ्यास हा त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय आहे. ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक शीतकरण पद्धतींच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरू शकते.
अध्यापन आणि संशोधनासोबतच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथकाचे समन्वयक म्हणूनही डॉ. संतोष दबडे महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री, उपप्राचार्य डॉ. एस. एम. गायकवाड, सर्व विभागप्रमुख, एनएसएस स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. संतोष दबडे यांच्या या यशामुळे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील योगदानात मोलाची भर पडली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
















