Mumbai Pune Expressway Traffice Jam l मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पर्यटकांचा महापूर; आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

लोणावळा : कामगार दिन व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनस्थळांकडे निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (बुधवार) पहाटेपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा पाहायला मिळत असून, काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासन्तास वेळ लागत आहे.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलीस व बोरघाट पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, विशेष उपाययोजना म्हणून मुंबईकडे जाणारी वाहने थांबवून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी सर्व सहा लेन खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, वाहनांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने कोंडी हटण्याची लक्षणे अद्याप दिसून येत नाहीत.
आज कामगार दिनाच्या सुट्टीमुळे शासकीय व निमशासकीय कार्यालये बंद आहेत, तसेच शाळांना उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने नागरिकांनी पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे महामार्गावर अचानक वाहनांची गर्दी वाढली असून, रस्त्यात अडकलेल्या पर्यटकांना वेळेचे नियोजन कोलमडले असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.