Glass Sky Walk l लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
लोणावळा : मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या लोणावळ्यातील बहुप्रतीक्षित ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. लोणावळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या कुरवंडे परिसरातील टायगर आणि लायन्स पॉईंट येथे प्रस्तावित सुमारे १२५ मीटर लांबीच्या ग्लास स्कायवॉक प्रकल्पाच्या निविदेचा मसुदा अंतिम करण्यात आला असून, प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासाला चालना देतानाच लोणावळ्याची पर्यटन ओळख अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने त्यांनी या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप येत असल्याने मावळच्या पर्यटन क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरू आहे. पिंपरी-चिंचवड येथील कार्यालयात झालेल्या निविदा छाननी समितीच्या बैठकीत निविदा मसुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकल्पाला आवश्यक तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून दर विश्लेषणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून लोणावळ्याच्या निसर्गसौंदर्याचा अधिक आकर्षक पद्धतीने अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ परिसर विकास योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सुमारे २३ मीटर लांबीच्या ‘कॅंटिलीव्हर’ भागासह १२५ मीटर लांबीच्या काचेच्या पुलाचा समावेश आहे. याशिवाय पर्यटकांसाठी आकर्षक प्रवेशद्वार, व्ह्यूइंग गॅलरी, रेस्टॉरंट, पार्किंग व्यवस्था, स्वतंत्र वीज उपकेंद्र, स्वच्छतागृह तसेच परिसराचे व्यापक सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
ग्लास स्कायवॉकमुळे लोणावळा-मावळच्या पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण निर्माण होईल. परिणामी पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक हॉटेल व्यवसाय, खाद्यपदार्थ, वाहतूक, पर्यटन सेवा, लघुउद्योजक आणि स्थानिक रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे.
मावळ तालुक्याची निसर्गसंपदा, लोणावळा-खंडाळ्याची पर्यटन ओळख आणि राज्यातील वाढती पर्यटन क्षमता लक्षात घेता ग्लास स्कायवॉक हा केवळ एक पर्यटन प्रकल्प नसून मावळच्या भविष्यातील पर्यटन विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने मावळवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आमदार सुनील शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पुढे आलेल्या या प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याने मावळच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने ही निश्चितच ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण घडामोड ठरणार आहे.



















