Breaking news

लोणावळा दहीहंडी लोकोत्सव रौप्य महोत्सवी वर्ष l लोणावळा दहीहंडी लोक महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना आरोग्य संपदा राखण्यासोबतच व्यसनमुक्ती बाबत होणार जनजागृती

लोणावळा : एक दुसऱ्याला खांद्यावर घेत वर घेऊन जाणारा दहीहंडी हा कलियुगातील एकमेव खेळ असून या खेळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचा निश्चय लोणावळा शहरातील मानाची पहिली दहीहंडी असलेल्या मावळ वार्ता फाउंडेशन दहीहंडी लोक महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तरुणांमध्ये सांघिक खेळाची भावना निर्माण करण्यासोबतच त्यांना निरोगी व आरोग्य संपन्न बनवण्यास सोबतच व्यसनमुक्ती बाबत या दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असल्याची माहिती मावळ वार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण गायकवाड व दहीहंडी महोत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर येवले यांनी दिली. दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही दहीहंडी जल्लोष साजरी होणार आहे.

      मावळ वार्ता फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स, स्पेसलिंक केबल नेटवर्क, लोणावळा शहर पत्रकार संघ, सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्या माध्यमातून दरवर्षी लोणावळा शहरामध्ये ही मानाची पहिली दहीहंडी आयोजित केली जाते. दहीहंडी महोत्सवाचे यंदाचे 25 वे वर्ष असल्यामुळे यावर्षी दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 75 हजार रुपये रोख बक्षीस आयोजकांकडून दिले जाणार आहे. मुंबई भागातील 50 ते 55 दहीहंडी पथके व लोणावळा शहरातील 18 दहीहंडी पदके या दहीहंडी लोक महोत्सव मध्ये दरवर्षी सहभागी होत असतात. पाच थराची सलामी देणाऱ्या प्रत्येक संघाला आयोजकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते व मानाची हंडी फोडणाऱ्या पथकाला 51 हजार रुपये रोख बक्षीस दिले जाते. मागील 25 वर्षापासून ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे‌. यंदाचे 25 वे वर्ष असल्यामुळे बक्षीसाच्या रकमेमध्ये 25000 रुपये वाढ करत ती रक्कम 75 हजार रुपये करण्यात आली आहे.

      या दहीहंडी महोत्सव विषयी बोलताना डॉक्टर किरण गायकवाड म्हणाले सांघिक भावना निर्माण करण्यासोबतच त्यांना निरोगी शरीर कसे संपादित करता येईल व वेगवेगळ्या व्यसनांपासून तरुण कशा पद्धतीने दूर राहतील याबाबतची जनजागृती मावळ वार्ता फाउंडेशनच्या माध्यमातून व दहीहंडी सोहळ्याच्या माध्यमातून दरवर्षी केली जाते. यंदाची दहीहंडी ही देखील व्यसनमुक्ती नशामुक्ती हंडी म्हणूनच घोषित केली जाणार आहे. आजचा तरुण हे उद्याचे भविष्य आहे हे भविष्य सुरक्षित ठेवणे ही तुमची आमची प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे याकरिताच या सांघिक खेळाला जनजागृतीची झालर लावण्यात आली आहे. ओम फिटनेस च्या माध्यमातून उत्तम शरीर संपदा असणाऱ्या तरुणांना रोख स्वरूपाचे बक्षीस देत त्या माध्यमातून देखील तरुणांमध्ये शरीर संपदे बाबत जनजागृती केली जात आहे.     

       कलियुगामध्ये प्रत्येक जण एक दुसऱ्याचे पाय खेचण्याचे काम करत असताना दहीहंडी हा एकमेव खेळ व सण असा आहे की जो एक दुसऱ्याला खांद्यावर घेत पुढे घेऊन जातो. लोणावळा शहरातील ही मानाची दहीहंडी पाहण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागामधून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. स्थानिक संघांना देण्यात येणारे बक्षीस हे देखील संघांकडून लोकोपयोगी कार्यक्रमासाठी वापरले जाते. या खेळाच्या माध्यमातून तरुणांच्या सांघिक भावनेला बळ देण्याचे काम केले जाते. शहरातील ढोल पथकांना देखील या दहीहंडी महोत्सवामध्ये आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. जास्तीत जास्त नागरिकांनी या लोक महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे देखील आव्हान आयोजकांकडून करण्यात. 

     यावेळी डॉक्टर किरण गायकवाड, अध्यक्ष ज्ञानेश्वर येवले, निमंत्रक संजय अडसुळे, नवीन भुरट, सचिन पारेख, नासिर शेख, बाळासाहेब फाटक, मंगेश अग्रवाल, मनीषा भंबोरी, बाबुभाई शेख, संदीप वर्तक, हेमंत मुळे, बापूलाल तारे, आशिष बुटाला, भरत तिखे, जितेंद्र कल्याणजी, नूतन सदस्य संदीप कोराड हे उपस्थित होते.

इतर बातम्या

कर्ज देण्याच्या बहाण्याने बुटाला परिवाराने आमच्या घराचे खरेदीखत केल्याचा रांगणे परिवाराचा आरोप; कायदेशीर दस्तेवज करून घर विकत घेतल्याचा बुटाला परिवाराचा खुलासा

ठोंबरेवाडी लोणावळा येथील बंगल्यातील माळ्यातला घराबाहेर काढण्यासाठी बाऊन्सरचा वापर; नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सकाळपासून पोलीस ठाण्यात ठिय्या तरी गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ