इतिहास लढणाऱ्यांचा होतो, घरात बसणाऱ्यांचा नाही – ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांचे वक्तव्य

लोणावळा : "आईवडिलांचा अपमान आपल्या वर्तनातून होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे आवश्यक आहे. कारण इतिहास लढणाऱ्यांचा होतो, घरात बसणाऱ्यांचा नाही," असे प्रेरणादायी विचार ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांनी वेहरगाव येथे कीर्तनसेवेच्या माध्यमातून व्यक्त केले.
वेहरगाव येथील आई एकवीरा देवी पायथा मंदिराचे नूतनीकरण ग्रामस्थ व दानशूर भक्तांच्या सहकार्याने करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी देवीच्या अभिषेक व आरतीने झाली. त्यानंतर सत्यनारायण महाराजांची महापूजा संपन्न झाली. महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रात मंदिराच्या नव्या बांधकामासाठी मदत करणाऱ्या दानशूर भक्तांचा सत्कार करण्यात आला.
सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कर्जत येथील प्रसिद्ध युवा कीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज पठाडे यांची भावपूर्ण कीर्तनसेवा पार पडली. कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री आई एकवीरा पायथा मंदिर, वेहरगाव; टपरी संघटना; आई एकवीरा रिक्षा संघ व संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.