कार्ला येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 14 घरकुलांचे भूमिपूजन

लोणावळा : केंद्र व राज्य शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि "घरकुल आवास योजना" अंतर्गत कार्ला ग्रामपंचायतीमार्फत एकूण 14 भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, त्यांचे भूमिपूजन नुकतेच उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात मावळ गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात, विस्तार अधिकारी शुभांगी भूमकर, सरपंच दिपाली हुलावळे, उपसरपंच अभिषेक जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण हुलावळे, सचिन हुलावळे, सनी हुलावळे, सदस्या भारती मोरे, वत्सला हुलावळे, सोनाली मोरे, उज्वला गायकवाड आदींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कार्ला गावातील आदिवासी व भूमिहीन लाभार्थ्यांसाठी घरकुल मंजूर झाली होती, मात्र जागेअभावी अडथळा निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या सहकार्याने गायरान जमिनीपैकी दहा गुंठे जागा मंजूर होऊन या ठिकाणी घरकुल उभारले जाणार आहेत. भूमिपूजनप्रसंगी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रकल्प अधिकारी शालिनी कडू व कुलदीप प्रधान यांचे मनःपूर्वक आभार मानले.