Breaking news

लोणावळ्यात १४ लाखांची घरफोडी; देव्हाऱ्यासमोरील दागिन्यांवर चोरट्याचा डल्ला !

लोणावळा : लोणावळा शहरातील गवळीवाडा परिसरात घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाची बाहेरून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील किचनमध्ये असलेल्या देव्हाऱ्यासमोरील चौरंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १४ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सोमवार (दि. ९ नोव्हेंबर) रोजी सकाळी उघडकीस आली.

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलम सूर्यकांत कदम (वय ३५, रा. फ्लॅट क्रमांक १०१, देवकीनंदन अपार्टमेंट, गवळीवाडा, लोणावळा) यांच्या राहत्या घरी ही चोरी झाली. दि. ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.४५ ते सकाळी ७.३० या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या बाहेरून लावलेली कडी उघडून घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर घरातील देव्हाऱ्यासमोरील चौरंगावर ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये ८ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, ४ तोळे ५ ग्रॅम वजनाचा राणीहार, सोन्याचे चोकर, कानातील विविध सोन्याचे टॉप व झुमके, दोन सोन्याच्या चेन आणि एकूण २ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय २५ हजार ५०० रुपये रोख रक्कमही चोरट्याने लंपास केली आहे.

या सर्व दागिन्यांची व रोख रकमेची एकूण किंमत १४ लाख ५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी निलम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंदनशिव करीत आहेत.



इतर बातम्या