कार्ला फाटा ते वेहेरगाव रस्ता पाण्याखाली; आई एकविरा देवीच्या गडावर जाणार्या रस्त्याची दुरावस्था - वाहन चालक घेत आहेत ॲडव्हेंचरचा अनुभव
लोणावळा : लोणावळा शहर व परिसरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आई एकविरा देवीच्या गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान रस्ता जागोजागी पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहने चालवावी लागत होती. गावातील नागरिकांना व रिक्षा चालकांना देखील याचा मोठा फटका बसला. आई एकविरा देवीच्या गडावर जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण मागील एक वर्षापासून रखडले आहे. पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे मोठे लोट वाहत असून या पाण्यासोबत दगड देखील रस्त्यावर वाहून आल्याने या रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना ॲडव्हेंचर अनुभव येत आहे. गडाच्या पायऱ्यांवरून देखील मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे.
आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्यासाठी कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान सिमेंट रस्ता बनविण्यात आला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारे देखील बांधण्यात आली आहेत, मात्र रस्त्यावरील पाणी गटारात जाण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पाणी रस्त्यावरच साचत आहे. हा रस्ता झाल्यानंतर या भागातील रस्त्यावर पाणी साचण्याची समस्या सुटले अशी नागरिकांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे.
कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली आहेत. रस्त्याच्या बाजूने पूर्वी कितीही पाऊस पडला तरी पाणी वाहून जात असे आता बांधकामामुळे व त्यांच्या संरक्षण भिंतींमुळे पाणी वाहून जाण्यास अडथळे येत आहेत. त्यातच रस्त्यावरील पाणी नाल्यात जाण्याची योग्य सोय नसल्याने या रस्त्यावर कायम पाणी साचत आहे. मात्र ही समस्या सोडविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.





















