खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाकडून तीव्र निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन
लोणावळा : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे आणि धमकीवजा वक्तव्ये करणे अत्यंत गंभीर असून, यामुळे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचत आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकार बांधवांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने वडगाव मावळ येथे तीव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी खासदारांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पत्रकार संघातर्फे तहसीलदारांना व वडगाव मावळ पोलिसांना देण्यात आले.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान खपवून घेणार नाही
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात पत्रकार संघाने म्हटले आहे की, पत्रकार हे समाजातील अन्याय, भ्रष्टाचार आणि जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्रामाणिकपणे करत असतात. मात्र, सत्तेतील लोकप्रतिनिधींकडूनच जर अशा प्रकारे पत्रकारांना धमकावले जात असेल आणि त्यांचा अवमान केला जात असेल, तर ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांशी सन्मानाने वागण्याची अपेक्षा असताना अशी खालच्या पातळीची भाषा वापरणे पूर्णपणे अयोग्य आहे.
पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाची
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही शासनाची आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात कोणत्याही पत्रकाराला अशा प्रकारे धमकी, दबाव किंवा अपमानास्पद वागणूक मिळणार नाही, याची प्रशासनाने कडक दक्षता घ्यावी, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन देताना मावळ तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सचिव रामदास वाडेकर, कार्याध्यक्ष विशाल विकारी, प्रकल्पप्रमुख गणेश विनोदे. ज्येष्ठ पत्रकार व सदस्य मनोहर दाभाडे, रमेश जाधव, निखिल कवीश्वर, विलास भेगडे, रमेश कांबळे, चेतन वाघमारे, नितीन तिकोने, सतीश गाडे, रेश्मा फडतरे, शैलजा फुलकर, प्रभाकर तुमकर, संकेत जगताप, संजय हुलावळे, अतुल पवार, जगन्नाथ काळे, प्रफुल्ल ओव्हाळ, अंकुश दाभाडे, माऊली वाघमारे, अनिल घारे, राजेंद्र कांबळे, रामकुमार अग्रवाल, मनोज मोरे आदींचा समावेश होता. यावेळी उपस्थित सर्वच पत्रकारांनी खासदारांच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करत एकजुटीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.
लोणावळा शहर पत्रकार संघाकडून निषेध व कारवाईचे निवेदन
लोणावळा शहर पत्रकार संघाकडून देखील खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्यावर कडक कारवाई करा या आशयाचे निवेदन लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे. खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी बोलताना अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरली असून मारण्याची धमके देखील दिलेली आहे. त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायदा अधिनियम अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार संघाकडून करण्यात आले आहे.






















