Breaking news

मोठी दुर्घटना l पाटण गावात दरड कोसळली; तीन व्यक्तींसह एक घर दरडीखाली - ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल

लोणावळा : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. एका घरावर ही दरड कोसळली असून घरामध्ये तीन व्यक्ती आहेत. संपूर्ण माती व राडारोडा सदर घरावर असून हे नागरिक दरडी खाली अडकले आहेत. या घटनेची माहिती समजताच पाटण गावातील नागरिक तसेच पोलीस व महसूल यंत्रणा या घटनास्थळी दाखल असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

     लोणावळा शहर व मावळ परिसरामध्ये अक्षरशः आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस पडत आहे. गत 24 तासांमध्ये 625 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. आज सोमवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या कोसळदार पावसामुळे लोणावळा शहर व ग्रामीण परिसरामध्ये सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई पुणे मिसिंग लिं बोगद्याच्या तोंडाजवळ दरड कोसळल्यामुळे मिसिंग लिंकचा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर नायगाव साते या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक वाहने पाण्यामध्ये अडकले आहेत. पवनानगर भागातील ओझर्डे येथे रस्ता वाहून गेला आहे तर पवनानगर बाजारपेठ व वडगाव मावळ बाजारपेठेमध्ये पाणी घुसले असून रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी जमा झाले आहे.

     लोणावळा शहर व मावळ तालुक्याला पावसाने अक्षरशा झोडपून काढले आहे. सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. पावसाचा हा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर बातम्या