Lonavala Rain Information l लोणावळा शहरात शुक्रवारी 102 मिमी पाऊस; मावळातील पवना धरण 71 टक्के भरले

लोणावळा : लोणावळा शहरात शुक्रवारी 4 जुलै रोजी 24 तासात 102 मिमी (4.02 इंच) पाऊस नोंदविण्यात आला आहे. लोणावळा व परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मावळातील धरणे समाधानकारक भरली आहेत. मावळातील पवना धरण परिसरात पावसाचा जोर सध्या कमी असला तरी डोंगर भागात होत असलेल्या पावसामुळे व धरणात येणारे डोंगरातील पाणी यामुळे जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरणात आज मितीला 71 टक्के पाणीसाठा झाला आहे.
लोणावळा परिसरातील पावसाचा जोर पाहता दोन दिवस पाऊस 100 इंच चा आकडा पार करेल अशी परिस्थिती आहे. यावर्षी लोणावळ्यात आजपर्यंत 2392 मिमी (94.17 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी ही आकडेवारी केवळ 893 मिमी (35.16 इंच) एवढीच होती. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 6 व 7 जुलै रोजी घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाच्या सोबत वारा देखील मोठ्या प्रमाणात वहात असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाचा आसरा घेऊ नये, सुरक्षित स्थळी उभे रहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.