वाकसई येथील कीर्तन महोत्सवातील शिल्लक रकमेतून गरजू महाराजांना व दिंडी समाजाला मोठी आर्थिक मदत
लोणावळा : अधिक महिन्याचे औचित्य साधून अखंड मावळ तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने संत तुकाराम महाराज पादुका स्थान, वाकसई येथे भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला मावळ तालुक्यातील विविध गावांतून आणि उदार देणगीदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवासाठी जमा झालेल्या निधीतून खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहिली, तिचा विनियोग संप्रदायातील गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी आणि समाजकार्यासाठी करण्याचा एक अत्यंत स्तुत्य आणि आदर्श निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
आजारी महाराजांना रोख मदत; दिंडी समाजालाही दिला हात
तालुक्यातील परमार्थिक क्षेत्रात वर्षानुवर्षे निष्काम सेवा करणाऱ्या, परंतु सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या कीर्तनकार व भक्तांना या शिल्लक रकमेतून प्रत्येकी १०,००० रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यामध्ये ह.भ.प. नवनाथ महाराज ठाकर (माळेगाव), ह.भ.प. सोमनाथ महाराज सावंत (देवले), ह.भ.प. विलास महाराज कुंभार (औंढे) याचा समावेश आहे. यासोबतच, मावळ तालुका दिंडी समाज यांना स्वतःची हक्काची जागा खरेदी करता यावी, या उदात्त हेतूने संप्रदायाच्या वतीने तब्बल १ लाख रुपयांची भरीव आर्थिक मदत देण्यात आली आहे.
ॐ चैतन्य वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळाच्या कार्याचे कौतुक
या संपूर्ण उपक्रमात आणि महोत्सवाच्या यशस्वी आयोजनात 'ॐ चैतन्य वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ' यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि दिशादर्शक ठरले आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम करून न थांबता, आपल्याच क्षेत्रातील गरजू सहकाऱ्यांना आणि संस्थेला अशी मोठी मदत उभी केल्याबद्दल संपूर्ण मावळ तालुक्यातून या मंडळाचे मनापासून आभार मानले जात असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वारकरी संप्रदायाचा हा मानवतावादी दृष्टिकोन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवून गेला आहे.





















