Breaking news

MLA Sunil Shelke l पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद; आमदार सुनील शेळके मांडणार भूमिका

वडगाव मावळ, दि. २३ (प्रतिनिधी) - मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा आणि पिंपरी-चिंचवड शहरवासियांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प बाबत गुरुवारी (दि. २४ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके हे पवना बंद जलवाहिनीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असून याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती उठविल्यानंतरही हा प्रकल्प जैसे थे अवस्थेत होता. परंतु यंदा जुलै महिन्यात स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबत उच्चस्तरीय बैठक घेत सदर प्रकल्प आवश्यक असून शेतकऱ्यांच्या संमती, विश्वास आणि संवादातूनच हा प्रश्न सोडवला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंतर पुन्हा एकदा पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाला हवा मिळाली. त्यानंतर शेतकरी, लोक प्रतिनिधी, अधिकारी यांच्यात बैठका झाल्या. यादरम्यान मावळ तालुक्यातील काही शेतकरी, धरणग्रस्त यांच्या संघटनांनी बंद जलवाहिनीला विरोध कायम ठेवल्याने या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.

अशात आमदार सुनील शेळके यांची या प्रकल्पाबाबत भूमिका नक्की काय आहे? याबद्दल नेहमीच विचारणा होत होती. आमदार शेळके यांनीही लवकरच याबद्दल खुलासा करणारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे गुरुवारी होत असलेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके नक्की काय भूमिका मांडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

स्व. अजित पवार यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणार का? स्थानिक शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न, धरणाच्या पाण्यावर अवलंबून गावांचा पाण्याचा प्रश्न कसा सुटणार? पवना बंद जल वाहिनी प्रकल्प होणार की कायमचा रद्द होणार? पवना बंद जलवाहिनी प्रकल्प विरोधी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय कसा दिला जाणार? आमदार म्हणून आमदार सुनील शेळके यांची भूमिका कुठल्या बाजूने असणार? अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे या पत्रकार परिषदेत मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान आजपर्यंत आमदार सुनील शेळके हे नेहमीच धरणग्रस्तांच्या बाजूने उभे राहिल्याने गुरुवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत आमदार सुनील शेळके स्थानिक शेतकरी आणि मावळकरांच्या हिताचा निर्णय घेतील हीच सर्वांना अपेक्षा आहे. गुरुवार रोजी दुपारी बारा वाजता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वडगाव मावळ येथे ही पत्रकार परिषद होणार आहे.

इतर बातम्या