Breaking news

Lonavala Closed l अतिक्रमण कारवाईला विरोध नाही पण कारवाईतील मनमानीविरोधात सोमवारी लोणावळा बंदची हाक; छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषण

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून शहरात सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या कार्यपद्धतीविरोधात नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता, मनमानी व अरेरावीच्या भूमिकेतून कारवाई होत असल्याचा आरोप करत लोणावळेकर नागरिकांनी सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर रोजी एकदिवसीय ‘लोणावळा बंद’ची हाक दिली आहे. या बंदला शहरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील दुकाने व व्यावसायिक व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरिकांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडीला केवळ अतिक्रमणेच जबाबदार?

शहरातील वाहतूक कोंडी सुटावी, रस्ते मोकळे व्हावेत आणि स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना वाहतुकीचा त्रास होऊ नये, या मताशी कोणाचेही दुमत नाही. मात्र, शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला केवळ अतिक्रमणेच जबाबदार आहेत का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील वाहतूक समस्येमागे पुढील बाबीही तितक्याच कारणीभूत आहेत. 1) अनियंत्रित वाहतूक व्यवस्था, 2) अपुरी पार्किंग सुविधा, 3) वाहतूक व शहर नियोजनाचा अभाव, 4) प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य व ठोस उपाययोजनांचा अभाव

समान न्याय व पारदर्शकतेची मागणी

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला नागरिकांचा विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, कारवाई करताना सर्वांना समान न्याय मिळावा, कोणावरही अन्याय होऊ नये, संबंधित घटकांना पूर्वसूचना द्यावी आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाईच्या पद्धतीमुळे सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने प्रशासनाने वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था आणि अतिक्रमण नियंत्रण याबाबत सर्वसमावेशक धोरण राबवावे, अशी मागणी जोर धरत आहे. सोमवारी होणाऱ्या बंदच्या माध्यमातून नागरिकांच्या भावना आणि मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात येणार असून, नगरपरिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण लोणावळ्याचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या