Breaking news

Maval Maza News l शिवसेवा प्रतिष्ठानाच्या 2026 च्या ‘वंदे मातरम्’ रोजनिशीचे दिमाखात प्रकाशन

लोणावळा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्राणवायु ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीतास यावर्षी 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण झाली. भारतीय मातीतल्या भावना, सुर, संस्कार आणि स्वप्नांना वंदन करणारे हे गीत म्हणजे आपल्या राष्ट्रीय ओळखीचे प्रतीकच होय.

      या ऐतिहासिक पर्वाचे स्मरण जपण्यासाठी शिवसेवा प्रतिष्ठानतर्फे विशेष स्मृतीदिनानिमित्त ‘वंदे मातरम् – रोजनिशी 2026’ प्रकाशित करण्यात आली. रविवार, दि. 7 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) येथील टाटा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, देणगीदार यांसह मध्य रेल्वे पुणे विभागाच्या मेकॅनिकल विभागाचे प्रमुख विजय दडस आणि विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय संघटन मंत्री दादा वेदक यांची विशेष उपस्थिती लाभली.

     या सुंदर व सचित्र रोजनिशीचे अवलोकन करून उपस्थित मान्यवरांनी शिवसेवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाला मुख्य पाहुणे म्हणून ‘वंदेमातरम्’ या विषयाचे अभ्यासक मिलिंद सबनीस उपस्थित होते. त्यांनी 30–32 वर्षांपासून चाललेल्या संशोधनातील अनुभव रोचक शैलीत मांडले. प्रमुख वक्ते म्हणून रा. स्व. संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. वंदे मातरम् या दोन शब्दांच्या सामर्थ्याचे त्यांनी प्रभावी विवेचन केले. शिवसेवा प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली ही अमूल्य रोजनिशी प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रमातून आजच्या तरुण पिढीत निश्चितच “राष्ट्र प्रथम” ही भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संकेत खळदकर व गुरुराज कुंभार यांनी केले. शिवसेवा प्रतिष्ठानचे सुनील व्हरांबळे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती मांडली, तर आभार प्रदर्शन मंजिरी भुसारी यांनी केले. शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे यांनी रोजनिशी तयार करण्यामागील प्रयोजन, संशोधनप्रवास व संकल्पना प्रत्यक्षात आणताना आलेल्या प्रेरणादायी अनुभवांची माहिती दिली.

      कार्यक्रमात स्वरतरंग अकादमीच्या 15 बालकलाकारांनी सादर केलेली देशभक्तिपर गीते विशेष आकर्षण ठरली. नेहमीप्रमाणेच शिवसेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते उत्साह, परिश्रम व एकजुटीने कार्यरत राहून हा महत्त्वपूर्ण प्रकाशन सोहळा यशस्वीपणे संपन्न करण्यात अग्रेसर राहिले.

इतर बातम्या