Accident News l लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर अन्य प्रवासी जखमी
लोणावळा : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्यात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. रोडच्या कडेला उभा असलेल्या टाटा एस टेम्पोला पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आहेत, तर गाडीतील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज (दि. ३ जून) पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील झालावाडी भागात जैन सॅनिटोरियमसमोरील रस्त्यावर झाला.
याप्रकरणी राजू बर्मा माने (वय ३६, रा. दामूनगर, कांदिवली ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा टेम्पो (क्रमांक MH 04 KU 9628) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अंबादास बर्मा माने (वय ३८, रा. कांदिवली, मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे, तर बर्मा मुकिंदा माने (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.
लोणावळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू माने, त्यांचा भाऊ मयत अंबादास माने, वडील बर्मा माने आणि इतर काही लोक त्यांच्या ताब्यातील टाटा एस टेम्पो (क्रमांक MH 47 BL 7814) मधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने चालले होते. पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास लोणावळा गावच्या हद्दीत एचपी (HP) पेट्रोल पंपाजवळ, जैन सॅनिटोरियमच्या समोर अंबादास माने यांनी लघुशंकेसाठी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. लघुशंका करून झाल्यानंतर पाठीमागील सर्व लोक गाडीत व्यवस्थित बसले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी अंबादास हे गाडीच्या पाठीमागे गेले. याच दरम्यान पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका अज्ञात टाटा टेम्पो (क्रमांक MH 04 KU 9628) च्या चालकाने आपल्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने चालवला. या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टाटा एस गाडीला आणि पाठीमागे उभ्या असलेल्या अंबादास यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.
अंबादास यांचा जागीच मृत्यू; वडीलांच्या बरगडीला गंभीर दुखापत
ही धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या पाठीमागे उभे असलेले अंबादास माने यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच गाडीच्या आत व जवळ असलेले त्यांचे वडील बर्मा माने यांच्या छातीला, बरगडीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीतील इतर प्रवाशांनाही या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालक अपघातग्रस्त वाहन सोडून किंवा वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस हवालदार देविदास चाकणे करीत आहेत.





















