Breaking news

भांगरवाडी मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर लोणावळा नगर परिषदेची कारवाई; भाजी मार्केटमधील दुकाने देखील मागे सरकवली

लोणावळा : लोणावळा शहरामध्ये मागील काही काळापासून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टपऱ्या व हातगाड्या यांचे अतिक्रमण वाढले आहे. भांगरवाडी परिसरामध्ये सायंकाळच्या वेळेस पायी चालणे देखील मुश्किल झाली आहे. अनेक नागरिकांनी याबाबत नगर परिषदेमध्ये तक्रारी दिल्यानंतर लोणावळा नगर परिषदेच्या वतीने भंगारवाडी ते बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान अतिक्रमण कारवाई राबवत 22 होऊन अधिक टपऱ्या काढून टाकण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी टपऱ्या सदृश्य वाहने लावून व्यवसाय केला जात होता ती वाहने देखील काढून जप्त करण्यात आली आहेत. नगरपरिषदेच्या इमारतीसमोर असलेल्या भाजी मार्केटचे अनेक व्यवसायिक हे अगदी रस्त्यावर आले होते त्यांना देखील दुकाने मागे घ्यायला लावली असून त्यांचे रस्त्यावर आलेले अतिक्रमण देखील काढून टाकण्यात आले आहे.

लोणावळा शहरातील वाढत्या अतिक्रमणावर कोणाचाही अंकुश राहिला नसल्यामुळे ज्या ठिकाणी मोकळी जागा दिसेल व रस्ता थोडासा रुंद असेल अशा ठिकाणी मोठ्या संख्येने टपऱ्यांचा व छोट्या-मोठ्या हातगाड्यांचा विळखा पडू लागला आहे. अनेक ठिकाणी टपऱ्या भाड्याने देण्याचा व्यवसाय काही मान्यवर मंडळींनी देखील सुरू केला असल्याची जाहीर वाचता आढावा बैठकीमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली होती. लोणावळा शहरातील या वाढत्या अतिक्रमणांमुळे व टपऱ्या हातगाड्यांमुळे मुख्य बाजारपेठेमध्ये पायी चालणे तसेच वाहन उभे करण्यासाठी देखील कुठेही जागा उपलब्ध राहिलेली नाही. सर्वसामान्य नागरिकांकडून वारंवार या विरोधामध्ये आवाज उठवला जातो मात्र राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई होत नाही. वेगवेगळ्या भागातून लोणावळ्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावरील जागा ह्या स्वतःच्या मालकीच्या असल्याप्रमाणे दुकाने थाटले आहेत. नगर परिषदेच्या तीनही बाजूला अतिक्रमणे झाली आहेत. कुमार चौकापासून भांगरवाडी पर्यंत रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात टपऱ्या व हातगाड्या निर्माण झाल्या आहेत. अनेक वेळा जाहीर आढाव बैठकांमध्ये यावर चर्चा झाली कारवाई करण्याच्या सूचना झाल्या मात्र कारवाई होत नव्हती.

लोणावळा नगरपरिषदेने अखेर या सर्व टपऱ्या व हातगाड्यांच्या विरोधामध्ये दोन दिवसापासून विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व रस्त्यावर लावण्यात आलेल्या टपऱ्या व व्यावसायिक अतिक्रमणे यांच्यावर ही कारवाई मोहीम राबवली जात आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये लोणावळा नगर परिषदेकडून ही कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी व्यावसायिक स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेत आहेत. नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घ्यावेत व बाजारपेठेमध्ये आलेल्या नागरिकांना चालण्यासाठी त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे स्टेशनच्या कमानी पर्यंत देखील अनेक नवीन टपऱ्या उभे राहिले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी असलेली जागा ही गायब झाली आहे त्यावर देखील प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

इतर बातम्या