रायवूड भागामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदाई; पंधरा दिवसापासून काम बंद, सोमवारपासून या भागातील शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर
लोणावळा : विकासाच्या नावाखाली रायवूड भागातील मुख्य रस्ता हा ऑक्झिलियम शाळेच्या समोर खोदण्यात आला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हे काम मागील पंधरा दिवसापासून बंद असल्यामुळे खोदलेला रस्ता व त्याच्या आजूबाजूला पडलेली माती आजही तशीच पडून आहे. सोमवारी 15 जून पासून या भागातील शाळा सुरू होत आहेत. ऑक्झिलियम शाळा तसेच रायवूड इंटरनॅशनल या शाळांमध्ये मिळून साधारण तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना या लोणावळा नगर परिषदेच्या विकासाच्या नावाखाली खोदण्यात आलेल्या रस्त्याचा व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागणार आहे.
जून महिना सुरू आहे. मान्सूनला अद्याप सुरुवात झाली नसली तरी लोणावळ्यात पाऊस केव्हाही सक्रिय होऊ शकतो. अशावेळी या खड्ड्यांमध्ये पाणी साचून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच रस्त्याच्या कडेला पडलेली माती हिचा देखील चिखल होऊन वाहने रस्त्यावर घसरू शकतात. ही सर्व परिस्थिती माहीत असताना देखील लोणावळा नगरपरिषद या गोष्टीकडे का कानडोळा करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी सभापती जितेंद्र कल्याणजी यांनी यावर आवाज उठवला असून लोणावळा नगर परिषदेत तात्काळ येथील खड्डे बुजवत रस्त्यावरील माती उचलून घेऊन जावी अशी मागणी केली आहे.
मागील पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला ही खोदाई काम करण्यात आली आहे. मात्र अचानक हे काम बंद करण्यात आले? ते का बंद करण्यात आले? याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नगरपरिषदे कडून आलेले नाही. शाळांना सुट्टी असल्यामुळे या भागामध्ये रहदारी तुलनेने कमी होती. 15 जून पासून नियमित शाळा सुरू होणार असल्यामुळे शाळांमध्ये येणारे विद्यार्थी पालक व स्कूल व्हॅन चालक या सर्वांनाच याचा त्रास सहन करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी स्कूल व्हॅन उभ्या केल्या जात होत्या तसेच पालक आपली वाहने उभी करत मुलांना शाळेत सोडत होते त्याच ठिकाणी हे खोदकाम करण्यात आल्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थी सोडण्यासाठी आलेली वाहने या ठिकाणी रस्त्यावरच उभी राहणार असून त्यामुळे या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील होणार आहे.
मावळा पुतळा चौकापासून हा रस्ता पुढे भुशी धरणाकडे जातो. या रस्त्यावर सातत्याने पर्यटक वाहनांची देखील वर्दळ असते. त्यामुळे नगरपरिषदेच्या या निष्काळजीपणाचा फटका स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पर्यटक या सर्वांना बसणार आहे. लोणावळा नगरपरिषदेने याची तातडीने दखल घेत सदरचे खड्डे बुजवत रस्त्यावरील राडाराडा व माती उचलून घेऊन जात रस्ते पूर्ववत करावेत अशी मागणी नागरिक व पालकांकडून होत आहे.






















