पर्यटन नगरी लोणावळ्याला प्रतीक्षा मान्सूनच्या आगमनाची
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या पर्यटन नगरी लोणावळा शहराला मान्सूनच्या प्रतीक्षेचे वेध लागले आहेत. मागील वर्षी मे महिन्यामध्ये मान्सूनला सुरुवात झाली व 17 जून रोजी लोणावळ्यातील प्रसिद्ध असलेले भुशी धरण हे ओव्हर फ्लो झाले. साधारणपणे मागील तीन वर्षांचा अंदाज घेता 30 जून पर्यंत भुशी धरण ओव्हर फ्लो होते व खऱ्या अर्थाने पावसाळी पर्यटनाच्या सीजन ला सुरुवात होते. यावर्षी मात्र 7 जून ही तारीख आली तरी लोणावळा शहरामध्ये मान्सूनचे आगमन झालेले नाही. अवकाळी पाऊस देखील यावर्षी तुलनेने कमी प्रमाणात शहरामध्ये झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी उष्णता देखील जास्त राहिल्यामुळे लोणावळा शहरातील नागरिक हे गर्मीने हैराण झाले आहेत. 26 मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल व आठवडाभरामध्ये तो महाराष्ट्रात सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता मात्र मान्सूनचे आगमन उशिराने होत असल्यामुळे अद्याप देखील पर्यटन नगरी लोणावळा व मावळ तालुक्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला नाही.
वाढती उष्णता यामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा खंडाळा व मावळ तालुका ओळखला जातो. स्थानिक व्यवसायिकांनी मान्सूनच्या सीझनसाठी मोठी तयारी केली आहे मात्र अद्याप देखील मान्सूनचे आगमन न झाल्यामुळे सर्वांच्याच लक्ष हे माणसांच्या आगमनाकडे लागले आहे. लोणावळा व खंडाळा परिसरामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले असले तरी गरमीने ते अक्षरशा हैराण झाले आहेत. गाडी मधून अथवा हॉटेल व बंगलोंच्या एसी खोल्यांमधून पर्यटक बाहेर पडत नाहीत. सकाळ व संध्याकाळ मात्र पर्यटन स्थळांवर व रस्त्यांवर मोठी गर्दी होत आहे. लोणावळा शहरातील भुशी धरण हे पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असते सोबतच सहारा पुलासमोरील धबधबे टायगर पॉईंटचा विहंगम परिसर, पवना धरण, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, कार्ला लेणी, आंदर मावळा मधील हिरवागार निसर्ग व डोंगरदर्यांमधून वाहणारे धबधबे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक देखील उत्सुक आहेत मात्र मान्सूनचे आगमन लाभल्यामुळे अद्याप घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झालेली नाही.
केवळ पर्यटक व स्थानिक व्यवसाय करण्यास नव्हे तर मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मान्सूनचे वेध लागले आहेत. मावळ तालुका हा ज्याप्रमाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीने तो भात शेतीचा तालुका म्हणून देखील ओळखला जातो. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळ्यात भात शेती केली जाते व या भात शेतीसाठी पावसाचे नितांत गरज. धूळ वाफेचा अंदाज घेत शेतकरी भात रोपांची पेरणी करतो ज्या भागांमध्ये पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी पाणी देत भात रोपे तयार करण्यात आली आहेत. काही ठिकाणी भात रोपांची पेरणी करण्यात आली असून पावसाचे आगमन न झाल्यामुळे अद्यापही रोपे उगवलेली नाहीत. त्यामुळे देखील शेतकरी चिंतातूर आहे. भात शेतीसाठी पावसाची आवश्यकता असल्यामुळे तसेच रोपांची उगवण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील पाऊस गरजेचा असल्यामुळे बळीराजाचे देखील मान्सूनच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे.





















