Tiger Point l टायगर पॉईंट येथे हुक्का विकणाऱ्या दोघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

लोणावळा : पर्यटनाचे मुख्य ठिकाण असलेल्या आतवण गावाच्या हद्दीतील टायगर पॉईंट याठिकाणी एका दुकानात विक्रीसाठी हुक्का ठेवल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 7 जुलै रोजी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी वनरक्षक यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून मंगेश नदू कराळे (वय 25, रा. खंडाळा) व राकेश गणपत वारे (वय 25, रा. खोपोली) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण पोलीस परिसरात कोठेही अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजताच त्यावर प्रभावी कारवाई करत त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अनुषंगाने लोणावळा उप विभागात आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया सुरू आहेत. टायगर पॉईंट येथे हुक्का विक्रीवर बंदी घालण्यात आलेली असताना देखील काही व्यवसायिक हुक्का विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वारंवार आवाहन करून देखील काही स्थानिक व्यवसायिक अवैध व्यवसायाला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे.
पावसाळ्यात पर्यटकांचे होणारे प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. टायगर पॉईंट परिसरात सायंकाळी 6 ते सकाळी 6 दरम्यान पर्यटकांना थांबण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा परिसर वन विभागाच्या हद्दीत असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस व धुके देखील असते. याकरिता खबरदारी म्हणून रात्री येथे वन विभागाने अधिकारी नियुक्त करावेत अशा सूचना देखील त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस हवालदार जय पवार, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे यांनी ही कारवाई केली.
टायगर पॉईंट येथे अवैध व्यवसाय आढळून आल्यास कडक कारवाई करणार - सागर चुटके
टायगर पॉईंट, शिवलिंग पॉईंट हा परिसर वन विभागाच्या अखत्यारीत येतो. येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची माहिती टायगर पॉईंट व शिवलिंग पॉईंट येथील व्यावसायिकांची वन विभागाने मीटिंग घेऊन दिली होती. तसेच दुकानांमधून हुक्का, दारू विक्री केल्यास गुन्हे दाखल करण्याबाबत ताकीद दिली होती. असे असताना सुद्धा येथील मंगेश स्नॅक्स सेंटर या दुकानात हुक्का मिळून आला आहे. वन अधिकारी गस्त घालत असताना त्यांना ही बाब निदर्शनास आली. याबाबत आयपीएस सत्यसाई कार्तिक व पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना माहिती देत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लोणावळा विभाग वन परिमंडल अधिकारी सागर चुटके यांनी दिली. तसेच सूचना देऊन देखील पालन करत नसल्याने सदरचे दुकान वन विभागाच्या जागेतून निष्कासित करण्याची कारवाई देखील केली जाणार असल्याचे सांगितले.