तळेगाव पोलिसांची मोठी कारवाई : खोटी सोन्याची चैन देऊन 70 हजारांची फसवणूक करणारे दोन ठग अटकेत

मावळ माझा न्यूज नेटवर्क : सोनारालाच खोटी सोन्याची चैन देत 70 हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन ठगांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी बनावट सोन्याची चैन खरी असल्याचे भासवून पैसे उकळले होते. पोलिसांनी त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम आणि बनावट चैन जप्त केली आहे.
तक्रारदार विक्रांत गणेश दाभाडे (वय 19, रा. माळवाडी, मावळ) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता ते आपल्या ‘हरी ओम ज्वेलर्स’ या दुकानात असताना दोन अनोळखी इसम दुकानात आले. त्यांनी एक सोन्याची चैन मोडण्यासाठी दिली व ती खरी असल्याचा दावा केला. खात्री पटल्यावर त्यांनी 70,000 रुपये घेऊन पसार झाले. मात्र, काही वेळानंतर ही चैन बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांचा जलद तपास आणि आरोपींच्या मुसक्या आवळल्या
तपासासाठी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत रावण आणि पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. अखेर, आरोपी गणेश शिवाजी भिंगारे (वय 36, रा. फणसडोंगरी, पेण, रायगड) आणि राकेश भवानजी पासड (वय 42, रा. आर्चिड बिल्डिंग, अंबरनाथ पश्चिम) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून 70,000 रुपयांची रोकड आणि बनावट सोन्याची चैन हस्तगत केली आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर, पो. हेड कॉ. अनंत रावण, पो. ना. ज्ञानेश्वर सातकर, पो. कॉ. भिमराव खिलारे, पो. कॉ. विनायक शेरमाळे, पो. कॉ. स्वराज साठे आणि पो. कॉ. रमेश घुले यांनी मोलाची भूमिका बजावली. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
तळेगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन
सोन्या-चांदीच्या व्यापार्यांनी मोठ्या व्यवहारांमध्ये विशेष दक्षता घ्यावी आणि कोणत्याही संशयास्पद व्यक्तींविषयी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन तळेगाव पोलिसांनी केले आहे.