मोठी कारवाई l लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: 57 हजार किलो गोमांस जप्त, दोन कंटेनर ताब्यात

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 57 हजार किलो गोमांस जप्त केले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर संशयास्पद वाटणारे दोन कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. 25 मार्चच्या मध्यरात्री करण्यात आलेल्या या कारवाईत गोरक्षक संघटनांचाही सहभाग होता. तपासणी अहवालानंतर सदर मास गोमांस असल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कसे पकडले गेले कंटेनर?
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून दोन एसी कंटेनर संशयास्पद येत असून त्यामध्ये गोवंशीय मास असल्याचा संशय पुण्यातील एका गोरक्षकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांना संपर्क साधत व्यक्त केला होता. त्या माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन कंटेनर संशयास्पदरित्या आढळून आले. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे मांस असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. स्थानिक गोरक्षक संघटनांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कंटेनर ताब्यात घेतले. प्राथमिक टप्प्यात वाहतूकदारांनी ते म्हशीचे मांस असल्याचे सांगितले आणि आवश्यक कागदपत्रे दाखवली, मात्र गोरक्षक संघटनांनी यावर आक्षेप घेतला आणि मांसाच्या प्रयोगशाळा तपासणीची मागणी केली. पोलिसांनी दोन्ही कंटेनरमधील मांसाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. 29 मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, हे मांस गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत आरोपी?
लोणावळा ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे यांनी फिर्याद नोंदवली असून, कंटेनर क्रमांक MH 46 BM 9180 आणि MH 46 CU 9966 व चालक नदीम कलीम अहमद आणि नसीर मोहंमद अहमद (दोघेही राहणार न्हावाशेवा, नवी मुंबई) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही वाहतूक मे. एशियन फूड्स मीन अँग्रो (न्यू भोईबुडा, सिकंदराबाद, हैदराबाद) या कंपनीच्या आदेशाने होत असल्याचे समोर आले आहे. कंपनीचे मालक मोहम्मद सादिक कुरेशी यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले की, "गोमांस वाहतुकीबाबत कडक कारवाई करण्यात येईल आणि पुढील तपास सुरू आहे." हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक गोरक्षक संघटनांनी पोलिसांचे आभार मानत कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे राज्यभरात गोमांस तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
यामध्ये सर्व गोरक्षक, गोसेवक, पोलीस प्रशासन, हिंदुत्ववादी संघटना, हिंदु राष्ट्र सेना, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गोसेवा आयोग, प्राणी कल्याण अधिकारी कमिटी, हिंदु समिती लोणावळा व ग्रामीण परिसर, सर्व पक्षांचे पदाधिकारी, खोपोली येथील गोरक्षक, व सर्व सामान्य नागरिक, पोलीस प्रशासन यांच्या एकजुटीमुळे ही मोठी कारवाई झाली असल्याने लोणावळ्यातील गोरक्षक सदस्यांनी सर्वांचे आभार मानले आहे.