ऑनलाइन जुगारासाठी 9 लाखांची चोरी; लोणावळ्यातील घटनेतील आरोपी लातूरहून अटकेत

मावळ माझा न्यूज नेटवर्क : ऑनलाइन जुगाराच्या नशेत तरुण कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे धक्कादायक उदाहरण लोणावळ्यात समोर आले आहे. येथे एका तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी तब्बल 8.78 लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 9 मार्च रोजी घडलेल्या या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध घेतला. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव शेलू येथे लपून बसलेल्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपीची ओळख आणि गुन्ह्याचा तपशील
चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सचिन मोहन बोयणे (वय 32, रा. वराळे फाटा, तळेगाव दाभाडे, मूळ गाव बाभळगाव शेलू, जिल्हा लातूर) असे आहे. 9 मार्च रोजी लोणावळ्यातील कुसगाव येथे धनश्री सुपर मार्केटमध्ये चोरी झाली होती. घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लातूर जिल्ह्यात असल्याचे समजल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीनंतर सचिन बोयणे याने चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस यंत्रणेची कौतुकास्पद कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार: राहुल पवार, राजू मोमिन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, पोलीस कॉन्स्टेबल: सागर नामदास, तुषार भोईटे, मंगेश भगत, विजय गाळे, पोलीस नाईक: सतीश कुदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे करीत आहेत. लोणावळ्यात घडलेल्या या घटनेमुळे ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांवर नियंत्रण आणण्याची गरज अधोरेखित झाली आहे.