Breaking news

परंदवडी येथे पवना नदीपात्रात बुडून झारखंडच्या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एकाला वाचवण्यात यश

लोणावळा : बेबडओहोळ-परंदवाडी दरम्यान असलेल्या पवना नदीच्या पुलाजवळ पाहण्यासाठी आलेले दोन तरुण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने यातील दोन जण बुडू लागले होते. त्यापैकी एकाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले, तरी २१ वर्षीय अरमान कुमार हा तरुण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तब्बल दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे झारखंड आणि ओडिशा येथील रहिवासी असलेले तीन तरुण बेबडओहोळ-परंदवाडी दरम्यान पवना नदीच्या पाण्यात पाहण्यासाठी आले होते. यावेळी नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने यातील दोन तरुण अचानक पाण्यात बुडू लागले आणि वाहून जाऊ लागले. हे दोघे जण बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या रमाकांत दरवा (रा. ओडिशा) यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्या दोन तरुणांपैकी दीपक कुमार (रा. झारखंड) याला पाण्याच्या प्रवाहातून सुखरूप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अरमान कुमार (वय २१, रा. झारखंड) हा पाण्यात वाहून गेला आणि बुडाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तात्काळ शोधमोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या दिवशी शनिवार असूनही तब्बल ३ तास सलग शोध घेण्यात आला, मात्र पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने पहिल्या दिवशी यश आले नाही. अखेर आज रविवारी सकाळी पुन्हा नव्याने शोधमोहीम राबवण्यात आली. यावेळी मावळमधील प्रसिद्ध रेस्क्यू टीम्सनी नदीपात्रात कसून शोध घेतला असता, अरमान कुमार याचा मृतदेह मिळून आला.

या बचावकार्यात आणि मृतदेह शोधण्यात ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ आणि ‘शिवदुर्ग मित्र, लोणावळा’ च्या सदस्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या शोध मोहिमेत निलेश गराडे, भास्कर माळी, अनिश गराडे, रवी कोळी, केशव शेलगांवकर, भरत मेहंदळे यासोबतच आपत्कालीन प्रसंगी विरा ॲम्ब्युलन्स आणि साई ॲम्ब्युलन्स यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. नदीचा प्रवाह वाढलेला असताना नागरिकांनी आणि पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

इतर बातम्या