वयाच्या ९८ व्या वर्षीही विठ्ठल भक्तीचे अखंड चिंतन; बाळकृष्ण गोविलकर यांच्या 'पुंडलिका वरदे हरी विठ्ठल' अभंग संग्रहाचे वेहेरगाव येथे प्रकाशन!
लोणावळा : वेहेरगाव (मावळ) येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि श्री एकविरा देवीचे पुजारी बाळकृष्ण गोविलकर यांनी १९३० सालापासून रचलेल्या "पुंडलिका वरदे हरी विठ्ठल" या अभंग संग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या अभंग संग्रहाचे प्रकाशन श्री एकविरा देवी देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून देवस्थानचे उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, विश्वस्त विकास पडवळ, मावळ तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, संचालक शरद कुटे, मधुकर पडवळ, वेहेरगावच्या सरपंच अर्चना देवकर, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, देवस्थानचे विश्वस्त मारुती देशमुख, सामाजिक कार्यकर्ते योगेश पडवळ, प्रशांत पुराणिक आदि मान्यवर उपस्थित होते.
अभंग संग्रह समाजाला दिशा देणारा: दीपक हुलावळे
प्रकाशन प्रसंगी बोलताना देवस्थानचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी गोविलकर यांच्या विठ्ठल भक्तीचे कौतुक केले. ते म्हणाले, "हा अभंग संग्रह केवळ एक पुस्तक नसून समाजाला योग्य दिशा देणारा संस्कार आहे. बाळकृष्ण गोविलकर यांची विठ्ठलाप्रती असलेली निष्ठा, त्यांचे अखंड चिंतन आणि उत्कट भावभक्ती या अभंगांमधून खऱ्या अर्थाने अधोरेखित होते. हा संग्रह प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करणारा आणि वाचनीय असाच आहे."
वयाच्या ९८ व्या वर्षीही प्रतिभा उत्कट: प्रशांत पुराणिक
'साप्ताहिक अंबर'चे सहसंपादक प्रशांत पुराणिक यांनी गोविलकर यांच्या लेखन शैलीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, वयाच्या ९८ व्या वर्षीही बाळकृष्ण गोविलकर यांची काव्यप्रतिभा थक्क करणारी आहे. या अभंग संग्रहात त्यांच्या मनातील विठ्ठल भक्ती आणि शब्दांचे चांदणे चौफेर पसरले असल्याचे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. तर देवस्थानचे सचिव नवनाथ देशमुख यांनी, हा संग्रह म्हणजे भक्तांसाठी एक अनमोल प्रसादच आहे असे म्हटले आहे. गोविलकर यांनी आपल्या शब्दांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्रीविठ्ठलाची सुंदर पूजा बांधली आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
चार तपांची एकविरा माउलींची सेवा!
बाळकृष्ण गोविलकर यांनी सलग चार तपे (जवळपास ४८ वर्षे) कार्ला गडावरील श्री आई एकविरा देवीची पहाट पूजा अत्यंत निष्ठेने आणि भक्तीभावाने केली आहे. सध्या त्यांचा हाच पवित्र भक्तीचा आणि पूजेचा वारसा त्यांचे सुपुत्र संजय गोविलकर अत्यंत श्रद्धेने पुढे चालवत आहेत.
सोहळ्याचे नेटके संयोजन व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय गोविलकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन भास्कर बोकील आणि पूजा कोटस्थाने यांनी केले. जयंत गोविलकर व त्यांच्या स्नेहीजनांनी संपूर्ण सोहळ्याचे संयोजन केले होते. या सोहळ्याला वेहेरगावचे सर्व ग्रामस्थ, गोविलकर कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक आणि परिसरातील भाविक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















