सामुदायिक विवाह सोहळा 2026 l कार्ला फाट्यावर २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न; वादळाच्या चाहुलीनंतरही मंगलमय वातावरण कायम
लोणावळा : श्री एकवीरा देवी दुर्गा परमेश्वरी जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने कार्ला फाटा येथील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिराच्या प्रांगणात आयोजित २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आज 24 एप्रिल रोजी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. विवाहाच्या मुहूर्तावर परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची चाहूल लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र सनई-चौघड्यांच्या सुरात आणि पुरोहितांच्या मंगल घोषात मंगलाष्टकांचे पठण करत पारंपरिक रितीरिवाजांनुसार विवाह विधी शांततेत पार पडले. काही मिनिटांतच वातावरण पूर्ववत झाल्याने सोहळा निर्विघ्नरित्या पूर्ण झाला.
यंदा या सामुदायिक विवाह सोहळ्याचे पंधरावे वर्ष असून आतापर्यंत एकूण १६८ जोडप्यांचे विवाह या माध्यमातून पार पडले आहेत. विवाह हा मानवी जीवनातील सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. मात्र लग्नातील वाढता खर्च लक्षात घेता अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन गरीब व गरजू कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी या सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना राबविण्यात आली. या उपक्रमाला समाजातील दानशूर व्यक्तींचा मोठा पाठिंबा लाभला असून मावळ तालुक्यातील प्रतिष्ठेचा सोहळा म्हणून या कार्यक्रमाची ओळख निर्माण झाली आहे. सहभागी वधू-वरांना संसारोपयोगी साहित्य, सोन्याचे दागिने, विविध भेटवस्तू, लग्नसोहळ्याचे जेवण, वाजंत्री, बस्ते, साखरपुडा यांसह आवश्यक सर्व सोयी समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच वऱ्हाडी मंडळींसाठीही निवास व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात येते.
या सोहळ्यास मावळचे आमदार सुनील शेळके, भाजपाचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख रवींद्र आप्पा भेगडे, मुळशी तालुक्यातील नेते बाबुराव चांदेरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष रोहिदास हुलावळे, संस्थापक अध्यक्ष भाई भारत मोरे, दीपक हुलावळे, मिलिंद बोत्रे व सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. सकाळपासूनच कार्ला फाटा परिसर गजबजलेला असून संपूर्ण वातावरण आनंद, उत्साह आणि मंगलमय भावनेने भारलेले होता.





















