Breaking news

कार्ला येथील श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेजचा निकाल १०० टक्के; मुलींनी मारली बाजी

कार्ला : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचलित श्री एकविरा विद्या मंदिर व श्रीमती लाजवंती हंसराज गुप्ता ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्सचा बारावीचा निकाल १०० टक्के लागला असून, यंदाही निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. विद्यालयाच्या यशाची ही परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

     कॅालेजमध्ये नीता भाऊ कोकरे हिने (७९.३३ टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ गौरी रमेश आटोळे (७६.६७ टक्के) द्वितीय, तर निलम पोपट ठाकर (७१.६७ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळवला. दिव्या राहुल गायकवाड (६९.५० टक्के) आणि आर्या दत्तात्रय भानुसघरे (६७.६७ टक्के) यांनी अनुक्रमे चतुर्थ आणि पाचवा क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे पहिल्या पाचही क्रमांकावर मुलींनी आपले नाव कोरले आहे.

      विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, सहसचिव तथा शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर आणि खजिनदार राजेश म्हस्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पालक सदस्य सोनबा गोपाळे, पुणे जिल्हा बांधकाम समिती सभापती दिपाली हुलावळे, प्राचार्य संजय वंजारे, कार्ला गावच्या सरपंच उज्वला गायकवाड, उपसरपंच अभिषेक जाधव यांच्यासह सर्व संस्था संचालक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले.

      या यशात वर्गशिक्षिका प्रा. काजल गायकवाड, प्रा. सचिन हुलावळे, प्रा. अनिल चौधरी आणि लिपिक गणेश बोंबले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेल्या या यशामुळे कार्ला परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

इतर बातम्या