MLA SUNIL SHELKE l रोजगार हमीतील दिरंगाईवरून आमदार सुनील शेळके आक्रमक; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
लोणावळा : राज्यातील रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) कामांमध्ये होत असलेल्या दिरंगाईवर आमदार सुनील शेळके यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या आणि विलंब लावणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. विधानभवन येथे आमदार शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रोजगार हमी योजना समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
प्रलंबित कामांचा घेतला सविस्तर आढावा
या बैठकीत राज्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः यवतमाळ जिल्हा दौऱ्यादरम्यान समोर आलेल्या समस्या, अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आणि अद्याप प्रलंबित असलेल्या कामांच्या सद्यस्थितीवर या बैठकीत गंभीर चर्चा झाली. अनेक मंजूर कामे अद्याप अपूर्ण असल्याचे आणि काही कामे रद्द झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार शेळके यांनी प्रशासनाला धारेवर धरले. रखडलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक कामाचा स्पष्ट आणि सविस्तर अहवाल समितीसमोर सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
युवकांसाठी रेशीम उद्योगाला मिळणार चालना
ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या बैठकीत 'रेशीम लागवड' उद्योगाला प्रोत्साहन देण्यावर विशेष भर देण्यात आला. केवळ योजना आखून न थांबता, युवकांना प्राधान्याने अनुदान मिळावे यासाठी स्वतंत्र आणि प्रभावी कार्यप्रणाली राबवण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली. रोहयोच्या माध्यमातून ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती व्हावी, यासाठी महसूल, वनविभाग आणि रोहयो प्रशासनाने समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस समिती सदस्य आमदार राजेश वानखडे, आमदार हिकमत उढान, आमदार संजय दरेकर, आमदार किशोर दराडे आणि आमदार सुधाकर अडबाले उपस्थित होते. तसेच रोजगार हमी योजना विभाग, महसूल व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो), तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित होते.





















