आनंदवार्ता l एनएमएमएस परीक्षेत कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिरच्या चौघींचे यश; ६० हजारांची शिष्यवृत्ती जाहीर
लोणावळा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या 'आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती' (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेच्या चार विद्यार्थिनींनी पुणे जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या यशस्वी विद्यार्थिनींना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रत्येकी ६० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील कु. माधवी गोरख पिंपळे, आर्या गणेश गुजर, सलोनी गोपीनाथ देवकर आणि तनिष्का दीपक गायकवाड या चार विद्यार्थिनींनी या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शैक्षणिक क्षेत्रात मारलेली ही भरारी कौतुकास्पद ठरत आहे. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक उमेश किसन इंगुळकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर हे यश प्राप्त केले आहे. या शिष्यवृत्तीमुळे या विद्यार्थिनींच्या पुढील उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव व शालेय समिती अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक संजय वंजारे, जिल्हा परिषद सदस्या दिपाली हुलावळे, कार्ला गावच्या सरपंच उज्वला गायकवाड, उपसरपंच अभिषेक जाधव, पालक सदस्य सोनबा गोपाळे, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था संचालक मंडळ आणि कार्ला ग्रामपंचायत सदस्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





















