आनंदवार्ता l टीसीएसमध्ये विद्यार्थ्यांची दमदार निवड; सिंहगड लोणावळा कॅम्पसचा गौरव
लोणावळा : सिंहगड इन्स्टिट्यूट्स, लोणावळा कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. याच अनुषंगाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) या अग्रगण्य आयटी कंपनीमध्ये बॅच 2026 मधील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (SIT), लोणावळा येथील कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थी सावन सुंभे यांची ₹9.09 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. तसेच श्रेया नागरगोजे यांची 3.46 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. याचबरोबर एस. के. एन. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SKNSITS), लोणावळा येथील कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थिनी भाव्या भाट हिचीदेखील ₹3.46 लाख वार्षिक वेतन पॅकेजवर टीसीएसमध्ये निवड झाली आहे.
Tata Consultancy Services (TCS) ही भारतातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा व सल्लागार कंपनी असून ती जगभरातील ग्राहकांना सॉफ्टवेअर विकास, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाउड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्यवसाय उपाय सेवा पुरवते. गुणवत्ता, नवोपक्रम आणि जागतिक उपस्थितीमुळे टीसीएस ही आयटी क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांपैकी एक मानली जाते.
या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ. सुनंदा नवले, उपाध्यक्ष डॉ. रोहित नवले आणि उपाध्यक्ष डॉ. रचना नवले अष्टेकर यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला देण्यात आले. त्यांच्या विद्यार्थी-केंद्रित धोरणांमुळे शैक्षणिक गुणवत्ता आणि रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा. मयूर राऊत यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्य प्रकल्प अधिकारी एसटीईएसचे डॉ. एम. एस. गायकवाड, लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. शिवाजी देसाई, प्रभारी प्राचार्य डॉ. डी. एस. मंत्री तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी त्यांनी त्याच्या मेहनतीचे कौतुक करत त्याला उज्ज्वल व यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.





















