Lonavala Sports News l लोणावळा ओपन नॅशनल बोल्डरिंग चॅम्पियनशिप २०२६ ला देशभरातील गिर्यारोहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोणावळा : येथील प्रसिद्ध साहसी संस्था शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चवथ्या लोणावळा ओपन नॅशनल बोल्डरिंग चॅम्पियनशिप २०२६ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला देशभरातून प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले नामवंत आणि नवोदित खेळाडू या स्पर्धेत आपल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
गेल्या तीन वर्षांतील यशस्वी आयोजनाची परंपरा कायम राखत, शिवदुर्ग मित्र संस्थेने यंदा या स्पर्धेचे चौथे पर्व अत्यंत दिमाखात आयोजित केले होते. या स्पर्धेमुळे संपूर्ण देशातील क्रीडाप्रेमींचे लक्ष सध्या लोणावळ्याकडे वेधले गेले. ऑलिम्पिक क्रीडा प्रकाराचा प्रसार हेच ध्येय
सन २०२० पासून स्पोर्ट क्लाइंबिंग या क्रीडा प्रकाराचा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात या खेळाचा जास्तीत जास्त प्रसार व प्रचार करणे, युवकांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि देशातील नवोदित गिर्यारोहकांना हक्काचे राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हाच या भव्य स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पार पडत आहे. स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट क्लाइंबिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि स्पोर्ट क्लाइंबिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या थेट मार्गदर्शनाखाली व अधिकृत नियमावलीनुसार केले जात आहे. यामुळे स्पर्धेचा दर्जा कमालीचा उंचावला आहे.
लोणावळ्याची क्रीडा क्षेत्रात नवी ओळख
या सातत्यपूर्ण आयोजनामुळे लोणावळा शहराची ओळख केवळ पर्यटन स्थळ न राहता, राष्ट्रीय क्रीडा नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अधिक दृढ होत आहे. देशभरातील शेकडो खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी यांना एकाच छताखाली आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिवदुर्ग मित्र संस्थेने या उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे.
स्पर्धेला मिळालेले यश आणि खेळाडूंचा उत्साह पाहून शिवदुर्ग मित्र लोणावळा संस्थेच्या वतीने आनंद व्यक्त करण्यात आला. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व खेळाडू, त्यांचे पालक, मार्गदर्शक प्रशिक्षक, उपस्थित मान्यवर, प्रायोजक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था व क्रीडाप्रेमींचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.





















