अभिमानास्पद l आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत आराध्य गायकवाडला कांस्यपदक
लोणावळा : आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत लोणावळ्यातील कु. आराध्य वृषाली कुशल गायकवाड याने भारताचे नाव उंचावले आहे. बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात (स्टेडियम) आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत आराध्यने भारताचे प्रतिनिधित्व करताना २७ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले आहे. या कामगिरीमुळे लोणावळा परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चुरशीच्या लढतीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन
'फर्स्ट इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२६' (1st India International Open Taekwondo Championship 2026) ही स्पर्धा २० ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान बालेवाडी, पुणे येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेअंतर्गत २४ व २५ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या सामन्यांमध्ये आराध्यने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर चुरशीची लढत देत आराध्यने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन केले आणि २७ किलो वजनी गटात कांस्यपदकावर आपले नाव कोरले.
आराध्यच्या या यशामागे त्याचे मार्गदर्शक विक्रम बोभाटे आणि यश बोभाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले आहे. तसेच त्याचे वडील कुशल गणेश गायकवाड यांनी घेतलेले कष्ट, दिलेले प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण पाठबळ यांचाही या यशात महत्त्वाचा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आराध्यने मिळवलेल्या या पदकामुळे त्याचे कुटुंबीय, मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाची ही पहिली महत्त्वाची पायरी असून भविष्यातही तो देशासाठी अशीच उज्ज्वल कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून त्याचे व त्याच्या मार्गदर्शकांचे कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



















