प्रलंबित E चलन भरा व २० टक्के सवलत मिळवा l ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलन अभय योजना-२०२६’ जाहीर
लोणावळा : राज्यातील वाहनचालकांना मोठा दिलासा देणारी ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ शासनाच्या गृह विभागाने जाहीर केली असून, १ डिसेंबर २०२६ पासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र प्रलंबित चलान दंडाची रक्कम विहित मुदतीत भरल्यास दंडाच्या रकमेवर २० टक्के सवलत मिळणार आहे. याबाबतची माहिती महामार्ग सुरक्षा पथक, पुणे परिक्षेत्र कार्यालयामार्फत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
गृह विभागाच्या २७ नोव्हेंबर २०२६ च्या शासन आदेशानुसार लागू होणारी ही योजना वाहतूक पोलीस तसेच महामार्ग पोलिसांकडून बजावण्यात आलेल्या पात्र चलानसाठी लागू राहील. नागरिकांनी प्रलंबित चलान भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
योजना तीन टप्प्यांत राबविली जाणार
ही अभय योजना पुढील तीन टप्प्यांत कार्यान्वित केली जाणार आहे.
टप्पा १ – एकवेळची सवलत : २९ जानेवारी २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बजावलेली आणि १ डिसेंबर २०२६ रोजी भरणे बाकी असलेली ई-चलान या टप्प्यात समाविष्ट आहेत. यासाठी भरणा मुदत योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ठेवण्यात आली आहे.
टप्पा २ – लवकर भरणा सवलत : १ डिसेंबर २०२६ रोजी किंवा त्यानंतर बजावलेली ई-चलान या टप्प्यात येतात. चलान बजावल्यापासून ४५ दिवसांच्या आत भरणा केल्यास सवलत मिळेल; याचा सवलत कालावधी ३० नोव्हेंबर २०२७ पर्यंत राहील.
टप्पा ३ – न्यायालयात प्रलंबित चलान : ३० जानेवारी २०१९ ते २० जानेवारी २०२६ दरम्यान बजावलेली आणि १ डिसेंबर २०२६ रोजी न्यायालयात (आभासी न्यायालयासह) प्रलंबित असलेली चलान या टप्प्यात समाविष्ट आहेत. याची भरणा मुदत योजना सुरू झाल्यापासून ३० दिवसांच्या आत असून, वाहनधारकाच्या संमतीने व न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया होईल.
भरणा प्रक्रिया कशी असेल?
वाहनचालकांना वाहतूक पोलिसांच्या https://mahatrafficechallan.gov.in या अधिकृत चलान पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने दंड भरता येईल. तसेच जवळच्या वाहतूक पोलीस विभागात रोखीने दंड भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. दंड भरल्यानंतर चलानसमोर तडजोडीची नोंद करून नागरिकांना पावती दिली जाईल.
या बाबींना सवलत मिळणार नाही
पुढील प्रकरणांमध्ये या अभय योजनेचा लाभ मिळणार नाही
1)परिवहन विभागाने (RTO) बजावलेली चलान तसेच रद्द किंवा निकाली निघालेली चलान.
2) योजना सुरू होण्यापूर्वी भरलेल्या दंडाचा परतावा मिळणार नाही.
3) एखाद्या चलानमध्ये तडजोड न होणारा गुन्हा असल्यास संपूर्ण चलान या योजनेसाठी अपात्र ठरेल.
मुदतीनंतर कडक कारवाईचा इशारा
नागरिकांनी प्रलंबित चलान दंड मुदतीत भरून या संधीचा लाभ घ्यावा. मुदत संपल्यानंतर चलानची रक्कम नियमानुसार वसूल केली जाईल. तसेच वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहन परवाना निलंबन, वाहन जप्ती यांसारखी कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महामार्ग सुरक्षा पथक, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक यांनी दिला असून सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.



















