Lonavala News l लोणावळा नगरपरिषदेचा धडक निर्णय: वाहतुकीस अडथळा ठरणारी शहर पोलिसांची मुख्य वाहतूक चौकी हटवली; BSNL सीमा भिंत पाडली - रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
लोणावळा : लोणावळा शहरामध्ये दिवसेंदिवस बिकट होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने अतिक्रमणां विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज थेट मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेली लोणावळा शहर पोलिसांची मुख्य वाहतूक पोलीस चौकी हटवून मोठी धडक कारवाई केली. या कारवाईमुळे "अतिक्रमण हे खाजगी असो वा सरकारी, ते अतिक्रमणच असते" असा स्पष्ट आणि कडक संदेश नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.
दुजाभाव न ठेवता कारवाई; सरकारी भिंतींवरही फिरला जेसीबी
लोणावळा नगरपरिषदेने १८ नोव्हेंबरपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली आहे. कुमार चौक ते बाजारपेठ आणि भांगरवाडी परिसरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे काढल्यानंतर, पथकाने गवळीवाडा भागातील मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व बस स्थानक परिसराकडे मोर्चा वळवला.
प्रशासनाने कारवाईत कोणताही दुजाभाव ठेवला नाही. वाहतूक चौकी हटवण्यापूर्वी चौकीतील सर्व साहित्य व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितरीत्या बाहेर काढून ती दुसरीकडे हलवण्यात आली. याशिवाय, नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलाची सुरक्षा भिंत तसेच बीएसएनएल (BSNL) कार्यालयाबाहेरील भिंत व भरावही हटवून रस्ता रुंद करण्यात आला. नगरपरिषदेच्या या निष्पक्ष कारवाईमुळे अनेक नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून, उर्वरित अतिक्रमणे नगरपरिषद जेसीबीच्या साहाय्याने हटवत आहे.
योग्य ठिकाणी नवीन चौकी उभारण्याची नागरिकांची मागणी
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील व लोणावळा शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील ही महत्त्वाची वाहतूक पोलीस चौकी हटवल्याने स्थानिक नागरिकांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्य चौकातील चौकी हटवल्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या थांबण्याचा व बसण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशा योग्य ठिकाणी नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने तातडीने नवीन चौकी उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच पुन्हा नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.
तो बंद असलेला डीपी रोड मोकळा करण्याची मागणी
रस्ते रुंदीकरणाची मोहीम सुरू असतानाच, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाकडून लोणावळा रेल्वे स्थानकाकडे जाणारा एक ठिकाणी बंद असलेला 'डीपी रोड' तातडीने मोकळा करावा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी केली आहे. नगरपरिषदेने यापूर्वी २०२५ मध्ये कारवाई करून या डीपी रस्त्याचा एक भाग खुला केला होता, मात्र दुसरा भाग अद्यापही बंदच आहे. या परिसरात पीएमपीएमएल तसेच खोपोलीकडे जाणाऱ्या बसचा थांबा असल्याने नेहमीच मोठी गर्दी असते. हा रस्ता मोकळा करून नगरपरिषदेने ९ मीटरचा रस्ता उपलब्ध करून दिल्यास रेल्वे स्थानक व बस स्थानकाकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरळीत होईल, याकडे नासिर शेख यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.



















