Save Water - Save Life l संविधान दिनानिमित्त जल प्रतिज्ञेतून ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’चा संदेश; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना काटकसरीचे आवाहन
लोणावळा : देशाप्रती प्रेम, संविधानाप्रती निष्ठा, कर्तव्यजागृती आणि समाजसेवेचा वारसा जपणाऱ्या संविधान दिनाचे औचित्य साधत, व्हीपीएस हायस्कूल व विद्या विनय सभा गुरुकुल हायस्कूलच्या मराठी माध्यमाच्या शाळेत जलसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. यंदा महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या छायेत वाटचाल करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते, सजग नागरिक आणि संस्थेचे माजी विद्यार्थी सुधीर राईलकर यांनी विद्यार्थ्यांना ‘जल प्रतिज्ञा’ दिली.
गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळच्या परिपाठादरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. सध्या राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने भविष्यात पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ येऊ नये, यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब जपून व काटकसरीने वापरणे काळाची गरज असल्याचे श्री. राईलकर यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. ‘पाणी हेच जीवन आहे’ आणि ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ (Save Water, Save Life) हा मूलमंत्र प्रत्यक्षात कृतीत आणण्याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जल प्रतिज्ञेचा संदेश केवळ शाळेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या माध्यमातून थेट घरोघरी पोहोचावा आणि समाजात त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता. संविधानाने दिलेल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून निसर्ग आणि जलसंपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य असल्याचेही या वेळी अधोरेखित करण्यात आले.
व्हीपीएस शाळेत कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संस्थेचे सदस्य व शाळा समितीचे अध्यक्ष भगवान आंबेकर यांच्यासह प्रशालेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून त्यांनी जलसंवर्धनाचा संकल्प केला. गुरुकुल शाळेत मुख्याध्यापक बयाजी खुरंगे यांच्यासह शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















