त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड शिवस्मारकावर भव्य दीपोत्सव; हजारो दिव्यांनी उजळला शिवस्मारकाचा परिसर
लोणावळा : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड घेरेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेचे औचित्य साधून लोहगड येथील शिवस्मारकावर अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दीपोत्सवाच्या निमित्ताने लोहगड शिवस्मारकावर हजारो पणत्या आणि दिवे लावून संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. आकर्षक फुलांची आरास आणि सुंदर रांगोळ्यांनी शिवस्मारकाचे सौंदर्य अधिकच खुलले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषाने संपूर्ण परिसरात एक नवे नवचैतन्य निर्माण झाले होते. त्यातच किल्ले लोहगडचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्यामुळे उपस्थितांनी व शिवप्रेमींनी मोठा आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत व्यवसाय प्रमुख कै. संदीपजी जाधव यांना दीपवंदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत कार्यकारिणीचे सदस्य हेमंत हरहरे, तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि नीलिमाताई दाभाडे उपस्थित होते. आपल्या भाषणात हेमंत हरहरे यांनी कै. संदीपजी जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला. निर्मलवारी उपक्रमाच्या यशात संदीपजींचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या विचारांतून आणि जीवनातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन हरहरे यांनी केले.
तसेच, सन २०२६ हे वर्ष लोहगड विसापूर विकास मंचाचे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत असताना, संदीपभाऊंच्या जाण्याने मंचाचा भक्कम आधारस्तंभ हरपला आहे, अशी भावना मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केली. ग्रामस्थ व शिवप्रेमींची मोठी उपस्थिती
या दीपोत्सवाची पूर्वतयारी मावळ ऑटोमोबाईल असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
या सोहळ्यास सरपंच सोनालीताई बैकर, शंकर चिव्हे, महेंद्र बैकर, बाळू ढाकोळ, अर्जुन रसाळ, तुषार दिघे, कैलास चिव्हे, मंगेश रावणे, आकाश बैकर, रोशन ढाकोळ यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, अनिकेत अंबेकर, सचिन निंबाळकर, अमोल गोरे, गणेश उंडे, बसप्पा भंडारी, संदीप भालेकर, चेतन नाटक, राहुल वाघमारे, अजय मयेकर, तात्यासाहेब भराटे, सचिन आमले, निलेश भोसले, करण निकाजू आणि तानाजी सागावे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



















